लहरी निसर्गाच्या अवकृपेमुळे खरिपातील पीक उत्पादनात घट
By admin | Published: November 21, 2014 09:14 PM2014-11-21T21:14:46+5:302014-11-22T00:17:32+5:30
हवामानाचा परिणाम : दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल
कोपर्डे हवेली : प्रतिकूल हवामानामुळे व अवेळी पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. निघालेल्या उत्पादनाला बाजारपेठेत नीचांकी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामातील पिकांना सुरुवातीस पावसाने ओढ दिली. काही ठिकाणी पेरण्या झाल्या; पण उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरण्या झाल्या आणि पावसाने सुरुवात केली. सुमारे सतत ४० दिवस पाऊस पडला, त्यामुळे पिकांची वाढ झाली नाही. परिणामी पिकास उतारा चांगला मिळाला नाही. उत्पादनात घट
झाली.
दुबार पेरणी, बियाणाचे वाढते दर, मजुरांची मजुरी मशागतीचे, खतांचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली़ गेल्या वर्षी सोयाबीन ३० किलो बियाण्याचा दर १२५० रुपये होता़ यावर्षी दोन हजार पाचशे रुपयांचे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले़ गेल्याच वर्षी सोयाबीन बियाणाचा दर पाच हजारांपर्यंत जाऊन पोहोचला होता़ उत्पादन चांगले निघाल्याने शेतकरी समाधानी होता़ यावर्षी सोयाबीनचे सर्वच ठिकाणी उत्पादन घटले असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, अशी आशा होती़ यावर्षी सोयाबीनचा दर तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत आहे़
गेल्या वर्षी घेवड्याचा दर दहा हजारांपासून अकरा हजारांपर्यंत होता़ तर यावर्षी तीन हजार रुपये क्विंटलचा दर आहे़ भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घटले आहे़ भाताचे उत्पादन मात्र चांगले मिळत आहे़
सोयाबीन, घेवडा, भुईमूग, उडीद, चवळी आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून, चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघाला नाही़ त्यामुळे खरिपाची शेती तोट्यात गेली आहे़ बाजार
भाव नीचांकी मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आह़े़ (वार्ताहर)
सोयाबीनचा गेल्या वर्षीचा दर प्रतिक्विंटल साडेतीन हजारांपासून पाच हजारांपर्यंत
घेवडा यावर्षीचा दर प्रतिक्विंटल साडेदहा हजारांपासून अकरा हजारांपर्यंत
सोयाबीनचा यावर्षीचा दर प्रतिक्विंटल तीन हजारांपासून तीन हजार दोनशे पर्यंत
घेवडा यावर्षीचा दर प्रतिक्विंटल तीन हजारांपासून साडेतीन हजारांपर्यंत