नियोजन नसल्याने कृषी अर्थव्यवस्था कोलमडली
By admin | Published: September 6, 2016 01:35 AM2016-09-06T01:35:23+5:302016-09-06T01:39:59+5:30
पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाड तालुक्यात नवीन दोनशे शाळा खोल्या
कऱ्हाड : ‘विकासाचे अनेक कार्यक्रम सध्याच्या सरकारने बदलून टाकले आहेत. यातून आपला विकास सोडून विदर्भाचा विकास साधण्याचा सरकारचा हट्ट सुरू आहे. विदर्भाचा विकास झाला म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही. परंतु त्यापोटी पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबवणे चुकीचे आहे. सरकारकडे नियोजन नसल्याने कृषी अर्थव्यवस्था कोलमडली आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
काले, ता. कऱ्हाड येथे जनविकास यौद्धा प्रतिष्ठान व पैलवान नानासाहेब पाटील मित्र परिवाराच्या वतीने गावामध्ये सुमारे पन्नास कडबाकुट्टी मशीनच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. माजी पोलिस पाटील शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे संचालक व जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, इंद्रजित चव्हाण, सर्जेराव शिंदे, कृष्णत थोरात, अॅड. ए. वाय. पाटील, अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बामणे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे संघटक उदय पाटील-उंडाळकर, प्रवक्ते पै. तानाजी चवरे, सेवादलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, सचिन काकडे, रणजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘काले हे गाव स्वावलंबी आहे; पण सोयी-सुविधांचा अभाव असल्याने त्या उभ्या करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट झालेली कामे परत जात नाहीत याची प्रचिती तुम्हाला आली आहे. तालुक्यातील मंजूर विकास कामांबाबत सुरुवातीला गैरसमज पसरवला गेला. परंतु ती कामे हळूहळू सुरू झाली आहेत. आमच्या सरकारच्या काळातील अनेक योजना नवीन सरकारने बंद केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रमही त्यांनी इतरत्र विलीन केला आहे. काले ते नारायणवाडी रस्त्याचे कामही सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडकून पडले आह; पण त्या रस्त्याचे काम पूर्ण करणारच. तालुक्यातील १८३ धोकादायक शाळा खोल्यांचा प्रस्ताव पाठवून याबाबत नवीन खोल्या मिळाव्यात म्हणून माझा पाठपुरावा सुरू आहे. खूप पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यात दोनशे शाळा खोल्या मंजूर झाल्या आहेत. शेतीत यांत्रिकीकरण केले पाहिजे. तंत्रज्ञानयुक्त अचूक शेती केल्यास पुढील दहा ते वीस वर्षे शाश्वत उत्पन्न शेतकरी घेऊ शकणार आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीवरील रोजगाराचा भार कमी होईल.’
यावेळी पै. नानासाहेब पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. आमदार चव्हाण यांच्या हस्ते विलास यादव, आनंदा देसाई, संदीप यादव, नंदकुमार मोहिते, विठ्ठल यादव, संदीप यादव, कृष्णत यादव, बापूसाहेब पाटील व श्रीमंत काकडे यांना कडबाकुट्टी मशीनचे वाटप करण्यात आले. तानाजी चवरे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)