पेरणीयोग्य पावसाअभावी माणमध्ये पेरण्या खोळंबल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:25 AM2021-06-29T04:25:47+5:302021-06-29T04:25:47+5:30

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात आजपर्यंत सरासरी अवघा ५८ टक्के इतका पाऊस झाल्याने माण पूर्व भागासह तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या ...

Due to lack of rain for sowing, sowing was delayed ... | पेरणीयोग्य पावसाअभावी माणमध्ये पेरण्या खोळंबल्या...

पेरणीयोग्य पावसाअभावी माणमध्ये पेरण्या खोळंबल्या...

Next

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात आजपर्यंत सरासरी अवघा ५८ टक्के इतका पाऊस झाल्याने माण पूर्व भागासह तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आत्तापर्यंत अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, तर काही पेरलेल्या ठिकाणी दुबारा पेरणीचेही संकट ओढवले आहे.

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६५ मिलिमीटर आहे. दोन वर्षांत सातशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने उन्हाळ्यातही फारशी टंचाई जाणवली नाही. मात्र, यंदा जुलै महिना तोंडावर आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. जास्त म्हसवड मंडलामध्ये १०६ मिलिमीटर पाऊस झाला तर त्याखालोखाल दहिवडी ८३, मलवडी ७२, गोंदवले ६०, कुकूडवाड ३३, मार्डी ३२ तर शिंगणापूर सर्वात कमी २५ मिलिमीटर म्हणजे सरासरी ५८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

तालुक्यातील पेरणीयोग्य क्षेत्र ३८,०९१ हेक्टर आहे. त्यापैकी १३,२६१ हेक्टर क्षेत्रात बाजरी, मका, मूग, चवळी, मटकी, घेवडा, भुईमूग, कांदा यांची पेरणी झाली आहे. सरासरी ३४ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस पडेल या आशेवर धूळवाफेवर पेरणी झाली असून, पाऊस न पडल्यास दुबारा पेरणीचे संकटही ओढावू शकते. खरीप हंगामातील पेरणी येत्या १५ दिवसांत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही पावसाने हुलकावणी दिली आहे.

म्हसवड, मलवडी, गोंदवले परिसरात पेरणी झाली आहे. मात्र, कुकडवाड, वरकुटे-मलवडी, शिंगणापूर मार्डी परिसरात अद्याप बळीराजाने चाड्यावर मूठ धरलीच नाही. तालुक्यात १० तलाव आहेत. त्यापैकी लोधवडे, गंगोती, मासाळवाडी हे तीन तलाव कोरडे पडले आहेत तर इतर तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे.

कोट :

माण तालुका खरीप हंगामासाठी सज्ज असून, बी-बियाणे, खते यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तालुक्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये.

- प्रकाश पवार,

तालुका कृषी अधिकारी, माण

Web Title: Due to lack of rain for sowing, sowing was delayed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.