कमी पाण्याअभावी शिवारं पडली ओस..
By admin | Published: April 20, 2017 10:41 PM2017-04-20T22:41:26+5:302017-04-20T22:41:26+5:30
कमी पाण्याअभावी शिवारं पडली ओस..
कुकुडवाड : सध्या माण तालुक्यातील जनतेला दुष्काळ तसा काही नवीन नाही. अशा दुष्काळाच्या वाईट परिस्थितीमध्ये दुष्काळाबरोबर सतत झुंज देण्याची ताकद या माणवासीय जनतेत आहे. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या शिवारातील मागील पिकाची काढणी झाल्यापासून तसेच भीषण पाणी टंचाईमुळे व जमिनीतील भूजल पातळी कमी झाल्यामुळे तालुक्यातील वडजल, ता. माण पंचक्रोशी व परिसरातील शेतकऱ्यांची शेतीची शिवारं पाण्याअभावी ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
माण तालुक्यात सतत दरवर्षी दुष्काळ पाचवीला पूजलेला असतो. तालुक्याच्या अग्नेय बाजूस असणाऱ्या वडजल गावच्या पंचकृषीतील व परिसरातील पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे वडजल येथील जनतेला पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण बनला आहे. अशी पाण्याची भीषण टंचाई, खालावलेली भूजल पातळी, लोकांची पाण्यासाठी वणवण, विहिरींनी गाठलेला तळ, बंद झालेल्या कूपनालिका, यामुळे लोकांना पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. असे असताना शेतीला कुठून पाणी आणायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे वडजल परिसरातील शेतीची सर्रास शिवारं ओस पडलेली आहेत. अशा टंचाईमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये सध्या कोणतेही पीक नाही. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे सध्या शेतीला पुरेसे पाणी नसल्यामुळे शेतात शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. पीक घेता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे दुष्काळाबरोबर पाण्याविना दरडोई आर्थिक उत्पन्नामध्ये घट होत असल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही.
त्यामुळे सध्या शेतकरी येणाऱ्या पावसाची वाट पाहत बसला आहे. याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याकडे पावसाची वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला
नाही. (वार्ताहर)