लॉकडाऊनमुळे रोजी गेली... सहकार्यांमुळे रोटी मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:15+5:302021-05-29T04:28:15+5:30
सातारा : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य श्रमिकाला जिथं रोजगारापासून वंचित रहावं लागलं तिथं अंधांची काय बात? लॉकडाऊनमुळे रोजी ...
सातारा : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य श्रमिकाला जिथं रोजगारापासून वंचित रहावं लागलं तिथं अंधांची काय बात? लॉकडाऊनमुळे रोजी गेलेल्या अंध बांधवांच्या मदतीसाठी त्यांचे सहकारी आले आणि त्यांच्या दोनवेळच्या रोटीची सोय करून दिली.
जिल्ह्यातील बंध व्यक्तीसमोर कोरोनाने संकटाचा डोंगर उभार केला आहे. छोटे छोटे व्यवसाय बंद झाले, नोकरी गेली, हाताला काम नसल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाहासाठी पैसे कुठून कमवायचे? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. अंध व्यक्तीच्या कुटुंबांना काही सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. या कुटुंबांना धान्य व किराणा साहित्य देण्यात आले. पण तुटपुंजी मिळणारी ही मदतही आता संपू लागली आहे.
दृष्टिहिन बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अंध व अपंग बांधवांसाठी असलेल्या निधीतून अंध बांधवांना अर्थसाहाय्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी, अशी मगाणी आता जोर धरू लागली आहे. सक्षम असलेल्या गरीब गरजूंसाठी धावणाऱ्या काही स्वयंसेवी संघटनांनी नेत्रहिनांच्या विश्वात डोकावून त्यांनाही मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट :
स्वावलंबनामुळे मदतही मागणं कठीण
अंध बांधवांचे चलन वलन स्पर्श शक्तीवर अवलंबून आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे अनेकांच्या टपऱ्या बंद आहेत. दिवसाची शंभर दोनशे रुपयांची कमाई यामुळे थांबली आहे. अनेकांवर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा काळात सरकारी नोकरीवर असलेल्या अंध बांधवांकडून त्यांना मदत मिळते. अपंगत्वावर मात करून स्वावलंबी जीवन जगणाऱ्या अंधांना कोणाकडे मदत मागणही अवघड वाटते.
कोट :
स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाच टक्के निधी राखीव असतो. या निधीचा वापर आता १०० टक्के झाला पाहिजे. कोविड काळात या अनुदानाची मदत अंध बांधवांना खूप मोठी ठरेल.
- विश्वास सरनाईक
कोविड काळात अनेक जणांना बेरोजगारी आली आहे. फिनेल, पाकीट तयार करणाऱ्या छोट्या छोट्या व्यावसायिकांना धंदा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
- सुनीता कांबळे
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मला कामावरून कमी केले. रडायचं नाही तर लढायचं म्हणून कुटुंबाच्या मदतीने किराणामालाचे दुकान थाटलं तर तेही बंद आहे. उदरनिर्वाह चालविण्याचा प्रश्न आहे.
- सचिन फरांदे