औंध परिसरातील शेतकऱ्यांनी मिटवला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, मुरघास बनवण्याकडे कल; कसा बनतो मुरघास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 06:52 PM2022-01-06T18:52:22+5:302022-01-06T18:52:46+5:30

रशीद शेख औंध : खटाव तालुक्यातील शेतकरी आता शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळला आहे. पशुपालन व दुग्धव्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याचे ...

Due to non availability of fodder in summer, the farmer turned to making fodder | औंध परिसरातील शेतकऱ्यांनी मिटवला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, मुरघास बनवण्याकडे कल; कसा बनतो मुरघास?

औंध परिसरातील शेतकऱ्यांनी मिटवला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, मुरघास बनवण्याकडे कल; कसा बनतो मुरघास?

Next

रशीद शेख

औंध : खटाव तालुक्यातील शेतकरी आता शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळला आहे. पशुपालन व दुग्धव्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये ६० ते ६५ टक्के खर्च हा केवळ जनावरांच्या चाऱ्यावर होतो. तसेच उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध करताना शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. सर्वच शेतकऱ्यांना हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने आता मुरघास बनवण्याकडे शेतकरी वळला असल्याचे चित्र दिसत आहे.

असा बनतो मुरघास

हिरवा चारा म्हणजे ग्रामीण सगळीकडे मका पिकाला जास्त प्राधान्य दिले जात आहे. योग्यवेळी मका कापून बंदिस्त व हवाबंद मोठ्या पिशवीत कुट्टी करून साठवून ठेवलेल्या चाऱ्यात उपयुक्त अशा रासायनिक प्रकिया घडून येतात. आंबविलेल्या चाऱ्यातील पोषणमूल्यामध्ये काहीही घट न होता चारा स्वादिष्ट आणि चवदार बनतो. यालाच मुरघास म्हटले जाते.

पिशवीत भरून किमान २१ दिवस हवाबंद

मुरघासासाठी चारा फुलोऱ्यात असतानाच कापणी करतात. मुरघास तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाऱ्यामध्ये साधारणतः ६० टक्के ओलावा लागतो. चारा सुकल्यावर कुटीच्या साह्याने त्याचे अर्धा ते एक इंचापर्यंत बारीक तुकडे केले जातात व प्रकियेसाठी मोठ्या पिशवीत भरून किमान २१ दिवस हवाबंद ठेवले जातात. त्यानंतर तो जनावरांना घालण्यास सुरुवात करीत असतात.

जनावरांना बाराही महिने हिरवा चारा देणे शक्य नसते. त्यामुळे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने साठविणे आवश्यक आहे. दूध उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांचे दूध उत्पादन न घटता नियमित मिळायला हवे असेल, तर त्यांना रोजच्या आहारात हिरवा चारा देणे आवश्यक असल्याने मुरघासाचा उपाय आहे.

दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून..

मुरघास कोणत्याही हंगामात बनविता येते. उन्हाळ्यात मुरघास खाऊ घालून दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून ठेवता येते. शिवाय, जनावरांचे आरोग्य नीट राखण्यास मदत होते. तसेच चाऱ्याची बचत होते.

औंध परिसरात सर्रास शेतकरी मुरघासाचा वापर करीत आहेत. मुरघास बनवून ठेवला की, रोजच्या रोज चारा आणण्याच्या कामाची व वेळेची बचत होते. कुट्टी करून मुरघास बनवत असल्याने चाऱ्याची नासाडी थांबविणे शक्य होते. -अतुल पवार, गोपूज

Web Title: Due to non availability of fodder in summer, the farmer turned to making fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.