अधिकाऱ्यांमुळेच शेतकरी योजनांपासून वंचित

By admin | Published: December 26, 2015 11:56 PM2015-12-26T23:56:34+5:302015-12-27T00:09:40+5:30

जावळी पंचायत समिती सभा : कृषी योजनांचा पाठपुरावा करत नसल्याचा सदस्यांचा आरोप

Due to officials, farmers are deprived of schemes | अधिकाऱ्यांमुळेच शेतकरी योजनांपासून वंचित

अधिकाऱ्यांमुळेच शेतकरी योजनांपासून वंचित

Next

मेढा : जावळी तालुक्यात कृषी विभागाचे अधिकारी शासनाच्या योजनाबाबत पाठपुरावा करीत नसल्याने शेतकरी योजनेपासून वंचित राहत असल्याची टीका जावळी पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य मोहनराव शिंदे यांनी केली. यावेळी मासिक बैठकीला महसूल विभागाचे अधिकारी वारंवार बोलावून देखील हजर राहत नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
जावळी पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुहास गिरी यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आखाडकर सभागृहात झाली. यावेळी उपसभापती निर्मला कासुर्डे, सदस्य मोहनराव शिंदे, हणमंतराव पार्टे, रूपाली वारागडे, गटविकास अधिकारी गजानन भोसले उपस्थित होते.
तालुक्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. योजनेतील साहित्य शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप सदस्य मोहनराव शिंदे यांनी केला.
गेल्या वर्षभरात तालुक्यात पाईप आलेच नाहीत. याबाबत खुलासा करा, असे म्हणत कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर सदस्य हणमंतराव पार्टे यांनीही जिल्ह्यात इतर तालुक्यांत पाईप येतात अन् जावळीतच का नाही? याबाबत कृषी अधिकाऱ्यांना मी जिल्हा परिषदेत घेऊन जातो व वस्तुस्थिती दाखवितो, असे सांगितले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा झालाच नाही. (प्रतिनिधी)
निधीअभावी कामे रखडली
तालुक्यात महू-हातगेघर धरणातील पाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लेखी आदेश असल्याशिवाय सोडू नका, अशी मागणी सदस्यांनी केली. बांधकाम विभागाची अनेक कामे, अनेक गावांचे रस्त्याची कामे रखडली असून, तालुक्यातील एकीव ते रुंद रस्त्याचे काम निधीअभावी रखडल्याचे सदस्या रूपाली वारागडे यांनी सांगितले. तसेच हुमगाव ते बावधन या रस्त्याबाबतही कार्यवाही व्हावी, अशी आग्रही मागणी सभापती सुहास गिरी यांनी केली.
सर्वपक्षीय रास्ता रोको
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाबाबत संबंधित अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे या योजनेची कामेच कळत नसल्याने याबाबत सर्वपक्षीय रास्ता रोको करणार असल्याचा इशारा मोहनराव शिंदे यांनी दिला. तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून, वन विभागाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी उपसभापती निर्मला कासुर्डे यांनी केली.
सभागृहात ‘जामर’ हवाच
मासिक सभेच्या वेळी अधिकारी अन् सदस्य मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप किंवा गेम खेळण्यात मश्गुल असतात. आज एक सदस्य मोबाइल पाहण्यात दंग असल्याचा अनुभव आला. याबाबत सभागृहात ‘जामर सिस्टिम’ असावी अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.

Web Title: Due to officials, farmers are deprived of schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.