देसार्इंच्या दडपशाहीमुळे कॅनॉलची कामे अर्धवट
By admin | Published: September 20, 2015 08:50 PM2015-09-20T20:50:39+5:302015-09-20T23:44:54+5:30
विक्रमसिंह पाटणकर : जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ पेपरबाजी करत असल्याचा आरोप
पाटण : ‘आमदार झाल्यानंतर शंभूराज देसार्इंनी दोन विधानसभा अधिवेशन केली. यामध्ये त्यांनी पाटण तालुक्यातील अर्धवट राहिलेली सहा धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी मागणी केली नाही, पुनर्वसनाचे प्रश्न मांडले नाहीत. कॅनालची कामे यांच्याच दडपशाहीमुळे अर्धवट राहिली आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला महत्त्व न देता विद्यमान आमदार विधानसभेत बारीकसारीक भाषणे करुन फक्त पेपरबाजी करत आहेत. असा टोला माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी लगावला आहे.
पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटणकर म्हणाले, आमदार झाल्यानंतर शंभूराज देसार्इंनी अवघ्या ११ महिन्यांतच जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे १२ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर होऊन त्या पाटणकर गटाच्या विचारांच्या झाल्या. लगेचच पाटण बाजार समितीत आमदार देसाई पॅनेलचा १९-० असा दारुण पराभव झाला. त्यामुळे आमदार शंभूराज देसार्इंनी पाटणकर पिता-पुत्राचा धसका घेतला आहे. आ. देसाई कधी ९५ कोटी रुपयांचा तर कधी २०० कोटींचा निधी आणल्याचे जाहीर करत आहेत. मात्र, हे करताना तो निधी कोणत्या गावासाठी आणला याचा उल्लेख मात्र दिसत नाही. आम्ही मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन करण्यात आमदार देसाई धन्यता मानतात. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या सभोवतालच्या गावांना अद्याप निधी मिळू शकला नाही. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. हा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. तर उत्तरमांड धरणातील दोन ट्रॉली खडीसाठी विधानसभेचा लाखमोलाचा वेळ वाया घालविण्यात शंभूराज देसार्इंनी धन्यता
मानली.
घाटेवाडी आणि चेवलेवाडी पूनर्वसन शंभूराज देसाई २००४ मध्ये आमदार असताना झाले. त्या घाटेवाडीच्या पूनर्वसनाच्या भिंती पडू लागल्या आहेत. तर चेवलेवाडी ग्रामस्थांना किती लांबी रुंदीच्या खोल्या बांधून दिल्या. हे आता तेथील जनताच सांगत आहे. (प्रतिनिधी)
... तरी आत्ताच धसका
शंभूराज देसाई आमदार होऊन एक वर्षे झाले. आजपर्यंत तरी त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे. आता पुढे ४ वर्षे आहेत. तरीसुद्धा पाटणकर पिता-पुत्राची घोडदौड पाहून त्यांचे धाबे दणाणले आहेत. आमचे प्रतिबिंब त्यांना दिसू लागले आहे. झोप येईना अशी गत आमदारांची झाली की काय? असा सवाल माजी आमदार पाटणकर यांनी व्यक्त केला.