मुरुमाच्या भरावामुळे कोयनाकाठ धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:51 PM2018-09-07T22:51:10+5:302018-09-07T22:51:16+5:30
तांबवे : येथील कोयना नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी नदीच्या पात्रात मुरुमाचा भराव टाकण्यात आला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने तांबवे बाजूची मळी नावाची शेतजमीन पाण्याच्या प्रवाहाने तुटून गेली आहे. या कोयना नदीकाठी केलेल्या मुरूम व माती उत्खनानंतर ठेकेदाराने वेळेत भराव न काढल्याने जमीन वाहून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
तांबवे गाव कोयना नदीकाठी वसलेले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. नदीकाठची शेतजमीन पाण्याखाली जाते. येथील पूल ही पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होते. म्हणून येथे १२ कोटी ९६ लाख रुपयांचा नवीन उंच मोठा पूल मंजूर झाला आहे. त्याचे काम गतवर्षीपासून सुरू आहे. या पुलाचे काम एका कंपनीकडे आहे. या पुलाच्या कामासाठी नदीमध्ये भराव करून काम केले आहे. पुलाचे पिलरचे काम पूर्ण झाले. आता पुलाचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे.
पाऊस भरपूर पडल्याने व कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा वेग हा जादा झाला आहे. एका बाजूला भराव असल्याने तांबवेच्या बाजूला पाण्याची वेग मर्यादा वाढल्याने शेतजमीन वाहून गेली आहे. मळीची जमीन सुमारे दहा ते पंधरा फूट तुटून वाहून गेली आहे. ठेकेदाराने वेळीच भराव न काढलेल्यामुळे ही जमीन तुटली असल्याचा असा आरोप शेतकºयांनी केला आहे. शेतकºयांनी संबंधित ठेकेदारास सांगूनही त्याने नदीच्या एका बाजूचा भराव काढलेला नाही. याबाबत शेतकरी नीलेश
भोसले यांनी बांधकाम विभाग व ठेकेदाराला निवेदन व माहिती दिली आहे.
तरीही याकडे बांधकाम विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे. आता पुलाचे कामही झाले आहे. त्यामुळे तातडीने नदीमधील भराव काढून टाकण्यात यावा व बाधित शेतकºयांना त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.
नदीकाठाचे नुकसान तर नव्या रस्त्याची दुरवस्था
तांबवे-साकुर्डी फाटा या दरम्यानच्या रस्त्याचे गत काही महिन्यांपूर्वीच काम करण्यात आले होते. ठेकेदाराकडून या मार्गावर नवीन पद्धतीने रस्ता केला होता. मात्र, वाळू तसेच माती वाहतूक करणाºयांमुळे या रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. तांबवे येथील जुन्या पुलालगत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने त्यातून रात्रीच्यावेळी दुचाकी वाहनचालक भरधाव जात असताना घसरून किरकोळ जखमीही झालेले आहेत.