सातारा : प्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन, वाई तालुक्यातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:17 PM2018-09-25T13:17:02+5:302018-09-25T13:21:45+5:30
वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.
वाई : वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.
महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम झाल्यानंतर ती वाई तालुक्यातून वाहत जाते. उगमानंतर नदीपात्रावर वाई तालुक्यातच धोम धरण आहे. सध्या वाढते प्रदूषण, अतिक्रमण, श्री क्षेत्र धोम येथे नदीपात्रात प्रवाही पाण्याची कमतरता यामुळे नदीचे सौंदर्य हरपून भयावह स्थिती झाली आहे़ तर नदीपात्रात विविध प्रकारच्या वनस्पती, शेवाळ, जलपर्णी आहे.
धार्मिक विधी करताना नदीपात्रात अर्पण केलेले नारळ, कपडे व इतर वस्तू यामुळे नदीचे पावित्र्य हरपून गेले आहे़ नदीचे पात्र जलपर्णीमुळे पूर्ण झाकून गेले आहे. या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्र जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असे दिसत आहे.
नदीच्या सुरुवातीपासून स्वच्छता करण्यासाठी समूह संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीने श्री क्षेत्र धोम येथील विविध पौराणिक घाट स्वच्छ करण्यात आले. तर पाणी प्रदूषित होऊन दुर्गंधीयुक्त झाले होते़ यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते़, त्यावेळी धोम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये खर्च केला होता़ यावेळी प्रशासन व पर्यावरणप्रेमींच्या वतीने नदीपात्र स्वच्छता उपक्रमास जेसीबी, ट्रॅक्टर्स व इतर स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती़.
या अभियानात धोम ग्रामस्थांचा सहभाग हा उल्लेखनीय होता़ यावेळी सलग दोन महिने नदी स्वच्छतेचे काम चालू होते. पाण्यातील सर्व वनस्पती व शेवाळ काढण्यात आल्याने जलाशयाने मोकळा श्वास घेतला होता़ यामध्ये शेकडो स्वयंसेवकांनी श्रमदान करून योगदान दिले होते़.
या उपक्रमास राष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, तत्कालीन प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख, मकरंद शेंडे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले होते; परंतु नदीपात्रात प्रवाही पाणी येत नसल्याने पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपयोजना करावी व नदी प्रदूषणमुक्त करावी, अशी मागणी सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांनी केली आहे़.