पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार, कोयनेत ९९ टीएमसी पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:56 PM2019-08-05T13:56:56+5:302019-08-05T14:02:06+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, कोयनासह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, कोयनासह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजासह सातारा, वाई, पाटण, जावळी कऱ्हाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना, वीर, धोम, उरमोडी, तारळी, कण्हेर धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामध्ये कोयना धरणात ९९.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरणातील पाणीपातळी नियंत्रणात आणण्यासाठी १ लाख, ३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वीर धरणातून १ लाख ३ हजार ८०५ क्युसेक तसेच धोममधून १८ हजार, उरमोडीतून ८०००, तारळीतून ८ हजार ९४३, तर कण्हेरमधून १६ हजार ६४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, तारळी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तांबवे-कऱ्हाड पूल पाण्याखाली गेल्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला आहे.
तांबवे गावाला बेटाचे स्वरुप.
गावातील व्यापारी संकुला पाणी लागले व्यापारी माल बाहेर काढत आहेत. येराड-चिपळूण मार्गावर पाणी आले आले असून ज्योतिबानगरमधील दरड कोसळली आहे. तेथून पन्नास फुटांवरच असलेले घरही खचण्याची शक्यता असल्याने जगन्नाथ धोंडी साळुंखे यांच्या कुटुंब अंगणवाडीत हलविले आहे. साजूर गावाशेजारील डोंगरही खचला आहे.
कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरील कृष्णाबाई, साई मंदिरात पाणी शिरले आहे. पाटण शहरासह नवीन बसस्थानकात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पूर परिस्थिती असली तरी जिल्हा प्रशाासनाने आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.
वाईच्या महागणपती मंदिरात सहा फूट पाणी
कृष्णानदीला आलेल्या पुराचे पाणी वाईमधील महागणपती मंदिरात शिरले. मंदिरात सहा फूट पाणी साठले आहे. सुरक्षेसाठी मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे.
प्रमुख मुद्दे
१. कोयना, कृष्णा दुथडी भरुन
२. तांबवेतील दहा गावे संपर्कहिन
३. प्रतिसंगमावरील मंदिरात पाणी
४. पाटण तालुक्यातील येराड येथील वीज खांब पाण्याच्या प्रवाहाने हालत आहे.
५. येराडमध्ये दरड पडली, घराला धोका; दोन कुटुंबांचे स्थलांतर
लोकांच्या स्थलांतराला प्राधान्य
पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातील सुमारे ७०० कुटुंबे स्थलांतरीत करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्याबरोबरच रहिमतपूर - सातारा आणि कोरेगाव - सातारा हे रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता आहे.