पावसामुळे कासला मशिनरींची धडधड थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:56 PM2019-06-16T23:56:45+5:302019-06-16T23:56:50+5:30
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम १ मार्च २०१८ पासून युद्धपातळीवर सुरू झाले ...
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम १ मार्च २०१८ पासून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. आत्तापर्यंत एकूण धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच धरणाचे मातीकाम ९५ टक्के पूर्ण झाले असून, पिचिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मान्सूनचा पाऊस दाखल होत असल्याने धरणाचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्यात आले असून, दिवाळीनंतर कामास पुन्हा वेग येणार आहे.
सातारा शहराला कास, शहापूर योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. कास ही सर्वात जुनी पाणी पुरवठा योजना आहे. उन्हाळा सुरू होताच पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागते. पाणीसाठा शेवटी-शेवटी पाच ते सहा फुटांवर येतो. यंदाच्या वर्षी अगदी साडेतीन फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. वाढते शहरीकरण आणि पाण्याची दैंनदिन गरज पाहता १ मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.
धरणाची उंची वाढविण्याच्या कामी आत्तापर्यंत मातीकाम, रॉकटो (दगडी कोपरा), ट्रॅशरॅक स्ट्रक्चर, एलड्रेन व क्रॉस ड्रेनचे काम पूर्ण झाले आहे. तसेच शीर्षविमोचकाच्या पाईपलाईन अंथरण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या शीर्षविमोचकाच्या कामी पाईपलाईन अंथरण्यासाठी चारही बाजूला क्राँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. वरच्या बाजूला (उर्ध्व बाजू-पाण्याकडची बाजू) धरणाच्या पोटात सत्तर मीटर लांबीची लोखंडी पाईप अंथरली आहे. अधो बाजूकडील म्हणजेच पाटाकडेच्या बाजूचे साधारण तीस मीटर लांबीची लोखंडी पाईपलाईन व काँक्रिटीकरणचे काम झाले आहे. उर्वरित काम दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार आहे.
सर्व्हिस गेट व इमर्जन्सी गेट खाली-वर होण्यासाठी स्लॉट बसवण्यात आले आहेत. या गेटचे काम दिवाळीनंतर करण्यात येणार आहे. एकंदरीत धरणाचे वीस टक्के काम शिल्लक असून, मे २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. सांडव्याचे खोदकाम झाले असून, उर्वरित सांडव्याचे काम दिवाळीनंतर केले जाणार आहे. त्यामुळे धरणात मोठा पाणीसाठी होण्याची संकेत मिळत आहे.
विहिरीचे काम एक मीटरपर्यंत पूर्ण
विहिरीचे काम जमिनीच्या वर एक मीटरपर्यंत झाले असून, त्यावर सुरक्षिततेसाठी लोखंडी प्लेटा टाकून झाकण्यात आले आहे. तसेच तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्याच्या वाहणाºया पाण्याने धरणाला कोणतेही नुकसान पोहोचणार नाही, याची जलसंपदा विभागाकडून दक्षता घेतली आहे.