टंचाईमुळे ग्रामसेवकांचं मुक्काम पोस्ट कार्यक्षेत्र, सीईओंची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:59 PM2019-05-07T13:59:42+5:302019-05-07T14:05:41+5:30
सातारा जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट माहिती व तक्रार निवारण ग्रामसेवकांना तेथेच थांबून करावी लागणार आहे.
सातारा : जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईची स्थिती वाढत असल्याने समस्या व तक्रारी निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना संबंधित गावांच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यापुढे टंचाईच्या गावांतील अपडेट माहिती व तक्रार निवारण ग्रामसेवकांना तेथेच थांबून करावी लागणार आहे.
जिल्ह्यात गतवर्षी पूर्व भागात अपुरा पाऊस पडला. तर पश्चिम भागात धो-धो कोसळूनही सध्या टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील १८० गावे आणि ७६० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर हजारो पशुधनासाठीही टँकरच्याच पाण्याचा आधार आहे.
असे असतानाच मोठी जनावरे चारा छावणीत असून त्यांच्याबरोबर शेतकरीही घर सोडून राहिला आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेबरोबर समस्याही वाढू लागल्या आहेत. टँकरच्या खेपा वेळेवर येत नाहीत, लोकांना वेळेत पाणी मिळत नाही अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसेच ग्रामस्थांकडून पाण्याबाबत सतत मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी टंचाईच्या काळात ग्रामसेवकांनी काम करत असणारे गाव सोडू नये. गावातच मुक्काम करावा, असा आदेश काढला आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंततरी ग्रामसेवकांना संबंधित गावांतच मुक्काम करणे कमप्राप्त झाले.
जिल्ह्यात आज एक हजाराच्या वर ग्रामसेवक कार्यरत आहेत. अनेकांकडे दोन-तीन गावांचा कारभार आहे. तरीही या ग्रामसेवकांना तेथील माहिती ठेवावी लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांच्या या सूचनेने ग्रामसेवकांना पाण्याचा टँकर कधी येतो, जातो केव्हा, किती पाणी येते, किती लोकांना मिळाले. पाणी कोठे मिळाले नाही. चांगले पाणी आले आहे का ? अशी सर्व माहिती ठेवावी लागणार आहे.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांना अतिशय निकडीची रजा सोडून इतर कोणत्याही रजा मंजूर करण्यात येणार नाहीत. याबाबत गटविकास अधिकाºयांना दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सूचनांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर तत्काळ प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यात टंचाईची स्थिती वाढत आहे. लोकांना वेळेत व चांगले पाणी मिळणे आवश्यक ठरले असून त्यासाठी ग्रामसेवकांना संबंधित गावांतच थांबण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे पाण्याबाबतच्या काही समस्या असतील तर त्या त्वरीत सोडण्यास मदत होणार आहे.
- डॉ. कैलास शिंदे,
मुख्य कार्यकारी अधिकारी