तीव्र पाणी टंचाईने वरकुटे-मलवडीसह दुष्काळी भाग होरपळला
By admin | Published: June 10, 2017 12:00 PM2017-06-10T12:00:21+5:302017-06-10T12:00:21+5:30
पिण्याचे पाणी मिळवणे अवघड, टँकर सुरु करण्याची मागणी
आॅनलाईन लोकमत
वरकुटे-मलवडी (जि. सातारा), दि. १0 : वरकुटे-मलवडीसह परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने पशूपक्ष्यांसह मुक्या जनावरांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. परिसरातील तलाव कोरडे पडलेले आहेत तर रानावनातील पाणवठे सुकून गेले आहेत.त्यामुळे माणसासह जनावरांना पिण्याचे पाणी मिळवणे अवघड झाले आहे.
महाबळेश्वरवाडी येथील असणाऱ्या तलावातुन चार गावातील सुमारे पंधरा हजार जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षी परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे तलावात कमी पाणीसाठा झाला होता. त्यामुळेच वरकुटे-मलवडी येथे आजपर्यंत दहा ते बारा दिवसातून एकदा का होईना एक तास कसेबसे पिण्याचे पाणी मिळत होते; परंतु आता महाबळेश्वरवाडीच्या तलावात पाण्याचा टाकसुद्धा शिल्लक राहिला नसल्यामुळे सहाजिकच चार गावातील जवळजवळ पंधरा हजार जनतेला यावर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
यावर उपाय म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना लागणार्या पाण्यासाठी शासकीय टँकर सुरु करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.