पोटच्या मुलांकडून वडिलांना मारहाण, सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 04:15 PM2018-11-17T16:15:41+5:302018-11-17T16:34:44+5:30
सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी स्वत:च्या मुलाकडूनच वडिलांना मारहाण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा: जिल्ह्यात दोन ठिकाणी स्वत:च्या मुलाकडूनच वडिलांना मारहाण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेंद्रे ता. सातारा येथील दत्तात्रय मारूती गुजर (वय ६५) हे मुंबई डॉकयार्डमधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पेन्शन सुरू आहे. त्यांचा मुलगा रवींद्र (वय ३०) हा नेहमी पैशासाठी तगादा लावत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी रवींद्रने वडिलांकडे खर्चासाठी दोन हजार रुपये मागितले.
हे पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या रवींद्रने झाडूने वडिलांच्या डोक्यात आणि तोंडावर जोरदार फटके मारले. घरात वादावादी झाल्याचे समजल्यानंतर ते साताऱ्यात राहाणाऱ्या आपल्या मुलीकडे आले. परंतु रात्री त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतरच हा प्रकार समोर आला.
दुसरी घटना कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथे घडली. अशोक शंकर घाडगे (वय ७०) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहातात. दोन दिवसांपूर्वी त्यांची डुकरे अचानक मृत पावली. त्यामुळे त्यांनी डुकरांना वीष घालून मारले असल्याचा गावातीलच काही लोकांवर संशय व्यक्त केला.
त्यामुळे चिडलेल्या रवी घाडगे (वय ४०) या मुलाने त्यांच्या डोळ्यावर आणि नाकावर जोरदार बुक्की मारली. त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. तसेच डोळ्यालाही मोठी सूज आली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी या दोन्ही घटनांची दखल घेतली असून, त्यांनी दत्तात्रय गुजर आणि अशोक घाडगे यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. हे जबाब त्यांच्या भागातील पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहेत. त्यानंतरच संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.