उसाचे पीक ठरले दुहेरी संकट
By admin | Published: July 26, 2015 09:55 PM2015-07-26T21:55:28+5:302015-07-27T00:22:02+5:30
पाटण तालुक्यातील व्यथा : बाहेरील कारखान्यांनी बिले दिली नाहीत
अरूण पवार - पाटण -पाटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षी उसाचे पीक म्हणजे महासंकटच ठरल्यात जमा आहे. कारण, ऊस वाळून जाऊ लागला म्हणून तालुक्याबाहेरील कारखान्यांना ऊस घालण्यात आला. त्या कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना बिल दिलेले नाही. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
तालुक्यातील देसाई कारखाना विक्रमी ऊस नोंदणीमुळे यावर्षी १ जूनपर्यंत चालला. दुसरीकडे रक्ताचे पाणी करून शेतात वाढविलेला ऊस वाळून जाऊ लागला. त्यामुळे हवाल्दिल झालेल्या तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बाहेरच्या साखर कारखान्यांना ऊस घातला. तरीसुद्धा शेवटी व्हायचं तेच झालं. अजूनही बाहेरच्या कारखान्यांनी पाटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी संकटात आहे.
केवळ १२५० मेट्रिक टन गाळप क्षमता असणारा पाटण तालुक्यातील साखर कारखाना. त्यामानाने २५०० ते ५००० हजार मेट्रिक टन गाळपाची क्षमता असणारे कारखाने शेजारच्या तालुक्यात आहेत. त्यातच यावर्षी उसाचे उत्पादन अधिक झाले. त्यामुळे सर्वच कारखान्यांवर ऊस गाळपाचा भार आला. त्यातच पाटण तालुक्याचं राजकारण देखील ऊस आणि साखरेवरच बऱ्यापैकी अवलंबून आहे. त्यामुळे यावेळेस अनेक ऊस उत्पादकांची चांगलीच अडचण झाली. शेतकऱ्यांनी ऊस कऱ्हाड, वाळवा, सांगलीच्या कारखान्यांना घातला. अनेक शेतकऱ्यांनी १० ते ५० टनांपर्यंत ऊस बाहेर घातला आहे. मात्र बिले मिळाली नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर विचार करण्याची वेळ आली आहे.
अहोरात्र कष्ट करुन उसाचे पीक वाढवले होते. खते, पाणी देताना व मशागत करताना तहानभूक विसरून काम केले. ऊस वाळून जाऊ लागला म्हणून बाहेरील कारखान्यास घातला. त्याचे बील अद्याप मिळालेले नाही.
- मारुतराव बाचल, ढेबेवाडी
बिलासाठी मारावे लागतात हेलपाटे...
पाटण तालुक्यात साखर कारखाना आहे. मात्र आमचा ऊस नेण्यास विलंब झाल्यामुळे तो वाळून जात होता. त्यासाठी बाहेरच्या कारखान्यांना यावर्षी ऊस घालावा लागला. आता मात्र उसाच्या या बिलासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. उसाची बिले न मिळाल्याने आमच्यावर दुहेरी संकट आले आहे. यामधून मार्ग कसा काढावा हेच समजत नाही. काही महिन्यांवर गाळप हंगाम आला असतानाही ही परिस्थिती आहे, तुम्हीच आता याला वाचा फोडा, असे शेतकरी सांगत आहेत.