Satara: पती-पत्नीमध्ये वाद, पत्नी माहेरी गेली; जवानाने रागाच्या भरात पेटवले सासूचे घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:48 IST2025-02-27T13:48:29+5:302025-02-27T13:48:51+5:30
संबंधित जवानावर गुन्हा दाखल

संग्रहित छाया
सातारा : पती-पत्नीच्या भांडणातून सैन्य दलात असलेल्या जवानाने रागाच्या भरात सासूचे घर पेटवून दिले. यामध्ये आर्मीची कागदपत्रे, लाखाची रोकड या आगीत जळून खाक झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात संबंधित जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २४ रोजी रात्री साडेदहा वाजता आंबवडे खुर्द, ता. सातारा येथे घडली.
शैलेश नारायण बाबर (रा. वेळेकामथी, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या जवानाचे नाव आहे. शैलेश बाबर हा सैन्य दलात कार्यरत आहे. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्यामुळे त्याची पत्नी आंबवडे खुर्द, ता. सातारा येथे माहेरी गेली. सुटीवर आलेला शैलेश हा दि. २४ रोजी रात्री साडेदहा वाजता आंबवडे खुर्द येथे गेला. घरात कोणी नसताना त्याने सासूच्या घराला पेट्रोल ओतून आग लावली. काही क्षणात आगीने राैद्ररूप धारण केले.
घरातील संसारोपयोगी साहित्य, आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्म दाखला तसेच शैलेश याची आर्मीची कागदपत्रे, अर्धा तोळ्याची बोरमाळ, बचत गटाचे एक लाख, घराच्या तुळव्या, दरवाजा आगीत जळून खाक झाला. या प्रकारानंतर पत्नी प्रियांका शैलेश बाबर (वय २७, रा. आंबवडे खुर्द, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी जवान शैलेश बाबर याच्यावर गुन्हा दाखल केला. सातारा तालुका पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.