सांगलीकडून सिंचनासाठी मागणी; कोयनेतून पाणी सोडले, किती क्यूसेकने विसर्ग सुरु.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: December 3, 2024 07:05 PM2024-12-03T19:05:55+5:302024-12-03T19:06:25+5:30

नितीन काळेल  सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाणी मागणी झाल्याने कोयना धरणातून मंगळवारी सकाळच्या सुमारास ...

Due to demand of water for irrigation and non-irrigation from Sangli Irrigation Department release of water from Koyna Dam has started | सांगलीकडून सिंचनासाठी मागणी; कोयनेतून पाणी सोडले, किती क्यूसेकने विसर्ग सुरु.. जाणून घ्या

सांगलीकडून सिंचनासाठी मागणी; कोयनेतून पाणी सोडले, किती क्यूसेकने विसर्ग सुरु.. जाणून घ्या

नितीन काळेल 

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाणी मागणी झाल्याने कोयना धरणातून मंगळवारी सकाळच्या सुमारास विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करुन १ हजार ५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले आहे. तर सकाळच्या सुमारास धरणात १०१.४५ टीएमसी पाणीसाठा होता.

जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले. वार्षिक सरासरीच्या सुमारे १२० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे. तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे यंदा कोयना धरण ओव्हरफ्लो झाले. परिणामी पावसाळ्याच्या काळात धरणाचे दरवाजे उघडून पाणी विसर्ग करण्यात आला. आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापासून धरणातील विसर्ग थांबला होता. पण, सध्या सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाकडून कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी सुरू झाली आहे.

पावसाळ्यानंतर प्रथमच सांगली पाटबंधारे विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी झालेली आहे. सिंचन आणि बिगर सिंचनासाठीची ही मागणी आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने मंगळवारी सकाळी १० वाजता पायथागृहाचे एक युनिट सुरू केले आहे. या युनिटमधून १ हजार ५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. कोयना नदीपात्रातून हे पाणी पुढे जात आहे. तसेच भविष्यातही सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढत जाणार आहे.

टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजना अवलंबून..

कोयना धरणातील पाण्यावर अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन सिंचन योजनांसाठीही पाण्याची तरतूद आहे. कोयना धरणातील सर्वाधिक पाण्यावर सांगली जिल्ह्याचा हक्क आहे. त्यामुळे तरतूद आणि मागणीनुसार पाणी सोडावे लागते.

Web Title: Due to demand of water for irrigation and non-irrigation from Sangli Irrigation Department release of water from Koyna Dam has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.