उन्हाचा तडाखा; सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन, आरोग्य विभाग सतर्क
By नितीन काळेल | Updated: February 27, 2025 18:16 IST2025-02-27T18:15:34+5:302025-02-27T18:16:00+5:30
सातारा : जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून कमाल तापमान ३६ अंशावर जात आहे. तसेच पुढील तीन महिने तर पारा ...

उन्हाचा तडाखा; सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन, आरोग्य विभाग सतर्क
सातारा : जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून कमाल तापमान ३६ अंशावर जात आहे. तसेच पुढील तीन महिने तर पारा ४० अंशाच्या घरात राहणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच तेथे पुरेसा औषधसाठाही ठेवण्यात आलाय.
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. तसेच त्यामुळे मृत्यूही होणे संभवनीय असते. त्यातच आतापासूनच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढत चालले आहे. सातारा शहराचा पारा ३६ अंशावर जात आहे. तर पूर्व माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात ३७ ते ३८ अंशापर्यंत पारा राहतोय. या पार्श्वभूमीवर उष्माघाताने कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. यासाठी आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. तसेच उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनाही आवाहन करण्यात आलेले आहे.
उष्माघाताची कारणे
- उन्हाळ्यात शेतावर किंवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये तसेच काच कारखान्यात काम
- अधिक तापमानाच्या खोलीत काम
- घट्ट कपड्याचा वापर
उष्माघाताची लक्षणे
- थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
- भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साह, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना किंवा पेटके येणे
- रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था
प्रतिबंधात्मक उपाय
- वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे टाळणे
- कष्टाची कामे सकाळी किंवा सायंकाळी कमी तापमानात करणे
- उष्णता शोषून घेणारे कपडे (काळी किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत
- सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावीत
- जलसंजीवनीचा वापर, भरपूर पाणी प्यावे
- सरबत प्यावा, उन्हामधील काम अधूनमधून थांबवावे. सावलीत विश्रांती घ्यावी
- उन्हात बाहेर जातांना चष्मा, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर
उपचार काय ?
- रुग्णास वातानुकूलित किंवा मोकळ्या हवेशीर खोलीत ठेवणे. खोलीत पंखे, कुलर असावेत.
- रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न
- रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी
- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, आईस पॅक लावणे
- आवश्यकतेनुसार सलाईन देणे