Satara: कोयना नाही भरले; सिंचन, वीजनिर्मितीला फटका
By नितीन काळेल | Published: October 12, 2023 06:51 PM2023-10-12T18:51:33+5:302023-10-12T18:53:06+5:30
६० वर्षांत ९ वेळा धरणात कमी पाणी
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयनेत अवघा ९३ टीएमसी पाणीसाठा असल्याने सुमारे ६० वर्षांत धरण नवव्यांदा भरलेले नाही. त्यामुळे तरतुदीप्रमाणे सिंचन आणि वीज निर्मितीला पाणी कमी पडणार आहे. परिणामी या दोन्हींवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाटण तालुक्यात कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते. तसेच राज्यातील मोठ्या धरणांपैकी हे एक आहे. या धरणाची पूर्वी पाणीसाठवण क्षमता ९८.८८ टीएमसी होती. त्यानंतर क्षमता वाढविण्यात आल्याने २००६ पासून धरणात १०५.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा होऊ लागला आहे. या धरणक्षेत्रात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान होते. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असते. मात्र, यंदा पर्जन्यमान कमी झालेले आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झालेला आहे. यंदा धरण भरलेच नाही. तर सध्या ९२.९१ टीएमसीच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीवरही परिणाम होऊ शकतो.
कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा होत आहे. त्यातील ६७.५ टीएमसी पाणी हे वीजनिर्मितीसाठी राखीव आहे. तर सिंचनासाठी ५५ टीएमसी पाण्याची तरतूद आहे. सिंचनासाठीचे पाणी पावसाळ्यातील विसर्ग धरून आहे. यंदा मात्र, धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने सिंचन आणि वीजनिर्मितीवरही परिणाम होण्याची भीती आहे. यासाठी १५ ऑक्टोबर रोजी धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी किती पाणी राहणार हे निश्चित होणार आहे. तर यापूर्वीही आठवेळा धरण भरले नव्हते. त्यातील २००, २००१ आणि २००३ या वर्षात धरणात कमी पाणीसाठा होता.
कोयना धरण भरले नाही..
वर्ष पाणीसाठा
१९६८ ९४.२०
१९७२ ८९.६९
१९८७ ९१.२३
१९९५ ७६.२९
२००० ८७.१५
२००१ ८८.२२
२००३ ९३.५५
२०१५ ७८.७४
२०२३ ९२.९१