सातारा जिल्ह्यातील उन्हाळी क्षेत्र घटणार; पिकांवर ‘पाणी’ फेरणार
By नितीन काळेल | Published: February 13, 2024 07:31 PM2024-02-13T19:31:38+5:302024-02-13T19:33:37+5:30
सातारा : जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने उन्हाळी पीक क्षेत्रात वाढ झाली होती. पण, गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी ...
सातारा : जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने उन्हाळी पीक क्षेत्रात वाढ झाली होती. पण, गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. परिणामी कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा उन्हाळी क्षेत्र (ऊस सोडून) पाच हजार हेक्टरपर्यंत राहणार असले तरी प्रत्यक्षात पेरणी कमीच होऊ शकते. यामध्ये भुईमूगच मुख्य पीक राहणार आहे.
जिल्ह्यातील शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. जूनमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर चार महिने जिल्ह्यात पाऊस पडतो. यावरच खरीप तसेच रब्बी हंगामही अवलंबून असतो. तसेच पावसाने धरणे आणि तलाव भरल्यानंतर उन्हाळ्यातही शेतकरी विविध पिके घेतात. पण, गेल्यावर्षी पावसाने दगा दिला. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झाले. त्यामुळे जवळपास ३० टक्के पावसाची तूट राहिली आहे.
परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान झाले. तसेच आता रब्बी हंगामात पक्व स्थितीत असतानाही पिकांना पाणी मिळणे अशक्य झाले आहे. यामुळे पिकांची उत्पादकता घटणार आहे. याचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसणार आहे. असे असतानाच आता कृषी विभागाचे उन्हाळी हंगामाकडे लक्ष लागलेले आहे. यासाठी जिल्ह्यात किती क्षेत्र राहणार, याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने सध्या पूर्णपणे दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामावर परिणाम होणार आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा उन्हाळी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ४ हजार ८०३ हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये भुईमुगाचे २ हजार ६९९ हेक्टर राहू शकते. तसेच मका क्षेत्र २ हजार हेक्टरवर राहण्याचा अंदाज आहे. मक्याचे ३१ हेक्टर राहू शकते. यावर्षी उन्हाळी पिकांना पाणी कमी पडणाार असल्याने क्षेत्रात घट होऊ शकते.
गतवर्षी पाच हजार हेक्टरवर पेर..
जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच हजार हेक्टरवर उन्हाळी पेरणी झालेली होती. १०४ टक्के पेरणी झालेली. यामध्ये उन्हाळी भुईमुगाचे २८०० हेक्टरवर क्षेत्र होते. तर उन्हाळी बाजरीचे ९८१ हेक्टर तसेच मकेची पेरणी एक हजार हेक्टरवर झाली होती. सोयाबीन ८० हेक्टरवर घेण्यात आलेले. महाबळेश्वर वगळता सर्वच तालुक्यात उन्हाळी पिके घेण्यात आलेली.
उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात घट..
मागील दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली होती. २०२२ मध्ये उन्हाळ्यात १६०० हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आलेले. पण, वर्षभरापासून सोयाबीनचा दर उतरल्याने शेतकरी उन्हाळी सोयाबीन घेण्याकडे दुर्लक्ष करु लागलेत. त्यामुळे गेल्यावर्षी उन्हाळ्यात ८० हेक्टरवर सोयाबीन घेतले होते.