Satara: उन्हामुळे धरणातील पाणीसाठा होऊ लागला कमी, सिंचनासाठी मागणी वाढली
By नितीन काळेल | Published: April 21, 2023 04:08 PM2023-04-21T16:08:35+5:302023-04-21T16:23:08+5:30
पावसाळा सुरु होईपर्यंत कोयनेतील पाणीसाठा अत्यल्प राहण्याची भीती
सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगल्या पावसामुळे धरणे भरली. पण, आता उन्हाळा तीव्र होत चालला असून सिंचनालाही मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणे वेगाने रिकामी होऊ लागलीत. सध्या प्रमुख सहा धरणांत ८८ टीएमसी पाणीसाठा असलातरी गतवर्षीपेक्षा कमी आहे. तसेच कोयना धरणातही मागीलवर्षीपेक्षा १९ टीएमसीने साठा घटला आहे. त्यामुळे पाऊस वेळेत सुरू झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून मान्सूनचा चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हर फूल्ल होतात. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणातून पाणी सोडावे लागते. परिणामी नदीकाठच्या गावांनाही धोका निर्माण होतो. गेल्यावर्षी तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी पुढे गेली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सिंचनासाठी पाण्याची मागणी नव्हती.
मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून मागणीनुसार धरणांतून सिंचनासाठी विसर्ग करावा लागत आहे. आतातर पावसाळा तोंडावर आला आहे. दीड महिन्यानंतर मान्सूनचा पाऊस सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. पण, सध्या कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. त्याचबरोबर सिंचनासाठीही पाण्याची मागणी वाढलीय. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांत गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयनेतील साठाही वेगाने कमी होऊन सध्या ४२.६८ टीएमसीच राहिला आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होईपर्यंत कोयनेतील पाणीसाठा अत्यल्प राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतका आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणांत ८८.२३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो ६४.१४ टीएमसी इतका आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात ४२.६८ टीएमसी साठा आहे. म्हणजेच या धरणात अजूनही जवळपास ४० टक्के पाणी आहे. त्याचबरोबर इतर धरणांमध्येही पाणीसाठा शिल्लक असलातरी मागीलवर्षीपेक्षा कमी आहे. त्यातच उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. सिंचनासाठी पाणी मागणीत वाढ असल्याने आगामी दीड महिन्यात धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होणार आहे.
कण्हेर, उरमोडीतून सिंचनासाठी विसर्ग...
सिंचनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणांतून मागणीनुसार विसर्ग करण्यात येत आहे. सध्या कोयनेच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू आहे. तर धोम धरणाच्या डाव्या कालव्यातून ५७८ क्यूसेक वेगाने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. कण्हेरमधून २५० तर उरमोडी धरणातून डावा कालवा ४५० आणि नदीतून १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)
धरणे - यावर्षी - गतवर्षी - एकूण क्षमता
धोम - ६.८६ - ८.३१ - १३.५०
कण्हेर - ३.९३ - ४.९२ - १०.१०
कोयना - ४२.६८ - ६१.७५ - १०५.२५
बलकवडी - १.०३ - १.८७ - ४.०८
उरमोडी - ५.३५ - ७.०१ - ९.९६
तारळी - ४.११ - ४.३७ - ५.८५