दिलासा! पावसाच्या हजेरीमुळे सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई थोडी कमी
By नितीन काळेल | Published: October 3, 2023 07:06 PM2023-10-03T19:06:18+5:302023-10-03T19:16:04+5:30
तरीही ९६ टॅंकर सुरू, माणमध्ये टॅंकर कमी
सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस काही भागात चांगला झाल्याने टंचाईची स्थिती कमी होत आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या १०२ वरुन आता ९६ पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या ८६ गावे आणि ४०४ वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. त्यामुळे पावसाची ३५ टक्के तूट आहे. ही तूट दुष्काळी तालुक्यात अधिक आहे. परिणामी आजही अनेक भागात पाऊस पडत असताना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तरीही मागील १५ दिवसांत जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे काही गावांचे आणि अनेक वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणारे टॅंकर बंद झाले आहेत.
जिल्ह्यात सध्यस्थितीत माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे. ४७ गावे आणि ३४४ वाड्यांतील ७३ हजार नागरिक आणि ५७ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यासाठी ६१ टॅंकर सुरू आहेत. तर तालुक्यातील पांगरी, वडगाव, मोगराळे, पाचवड, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, मार्डी, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, धुळदेव, ढाकणी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, वाकी, रांजणी, हवालदारवाडी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, इंजबाव, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, विरळी, कुरणेवाडी आदी गावांना आणि त्या अंतर्गत वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
खटाव तालुक्यातील २१ गावे आणि २४ वाड्यांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. या टॅंकरवर २९ हजार नागरिक आणि ८ हजार २४९ जनावरांची तहान अवलंबून आहे. यासाठी १४ टॅंकर सुरू आहेत. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. फलटण तालुक्यातही १० गावे आणि ३६ वाड्यांसाठी १२ टॅंकर सुरू आहे. यावर प्रत्येकी १५ हजार नागरिक आणि पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातीलही चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी आदी सहा गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. वाई तालुक्यात चांगला पाऊस होतो. पण, सध्या तालुक्यातील चांदक आणि आनंदपूर गावासाठी टॅंकर सुरू आहेत.
माणमध्ये टॅंकर कमी..
माण तालुक्यात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती काही प्रमाणात कमी झालेली आहे. आठवड्यात टॅंकरची संख्या सहाने कमी झाली आहे. सध्या ६१ टॅंकरने नागरिकांना तसेच पशुधनाला पाणीपुरवठा केला जातोय. तर लोकांना पाणीपुरवठा होण्यासाठी १९ विहिरी आणि ३२ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. अधिग्रहण विहिरींची संख्या खटाव तालुक्यात सर्वाधिक आहे. तर जिल्ह्यात सध्या १ लाख ३४ हजार नागरिक आणि ८३ हजार पशुधनासाठी टॅंकर सुरू आहेत.