Crime News Satara: नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दौलतनगरातील दरोड्याचा प्रयत्न फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 03:39 PM2022-05-28T15:39:29+5:302022-05-28T15:40:43+5:30
अपार्टमेंटमधील नागरिकांनी आपआपल्या फ्लॅटमधून जोरजोरात आरडाओरडा करत सर्व नागरिकांना जागे केले. त्यामुळे दरोडेखोरांनी काढता पाय घेतला.
करंजे : सातारा मध्यवर्ती बसस्थानकापासून काही अंतरावरच असलेल्या दौलतनगर येथील एका सदनिकेत काहीजण दरोडा घालण्याच्या तयारीत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी आपापल्या घरातून ओरड्यास सुरुवात केली. यामुळे शेजारील लोक जागे होऊ लागल्याने दरोडेखोरांनी पलायन केले. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील दौलतनगर येथील श्री शिल्प अपार्टमेंटमध्ये शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे अपार्टमेंटमधील नागरिकांच्या लक्षात आले. तेव्हा अपार्टमेंटमधील नागरिकांनी आपआपल्या फ्लॅटमधून जोरजोरात आरडाओरडा करत सर्व नागरिकांना जागे केले. त्यामुळे दरोडेखोरांनी काढता पाय घेतला. नागरिक फ्लॅटमधून बाहेर आले असता एका फ्लॅटच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. लगेच शाहूपुरी पोलीस ठाण्यास कळविण्यात आले.
त्यानंतर लगेचच शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दरोडेखोरांच्या हाती तलवार, कोयता, गज व हातोडी असल्याचे दिसून आले. परंतु कोणत्याही प्रकारचे साहित्य चोरांच्या हाती न लागल्यामुळे याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नाही.
गाड्या चोरीच्या घटनांत वाढ
या अपार्टमेंटच्या आजूबाजूच्या ठिकाणी बऱ्याच वेळा गाड्या चोरीला जाण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात असे नागरिकांकडून सांगितले जात आहे. दरोड्याच्या प्रकारात कोणासही दुखापत झाली नाही किंवा किमती ऐवज चोरीस गेला नसल्यामुळे अपार्टमेंटमधील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता या प्रकारावर पोलीस काय निर्णय घेतील याच्यावर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.