शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, ६ तालुक्यांत गारपीट; ५१ गावांना फटका

By नितीन काळेल | Published: April 17, 2023 08:58 PM2023-04-17T20:58:42+5:302023-04-17T20:58:56+5:30

अवकाळीचा घात लाखांत, वळवाचा ७ कोटींत, वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे.

Due to unseasonal rain in Satara, loss of farmers, 51 villages affected | शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, ६ तालुक्यांत गारपीट; ५१ गावांना फटका

शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे, ६ तालुक्यांत गारपीट; ५१ गावांना फटका

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आताच्या वळवाच्या तडाख्याचाही शेकडो बळीराजाला फटका बसलाय. अवघ्या आठवड्यातच ६ तालुक्यांत गारपीट झाली असून ५१ गावे बाधित आहेत. यामध्ये ३५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असेलतरी फळबागांची हानी अधिक आहे. त्यामुळे अवकाळीत लाखांत असलीतरी आता ७ कोटींवर हानी झाल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात नुकसान झाले होते. सर्वाधिक नुकसान हे वाई तालुक्यात झाले होते. वाईत फळपिके सोडून बागायत पिकांखालील बाधित क्षेत्र हे २२० हेक्टर होते, तर याचा फटका १,१९७ शेतकऱ्यांना बसलेला. महाबळेश्वर तालुक्यात ६४ हेक्टरवरील पिके अवकाळीमुळे बाधित झाली. यामुळे २४० बळीराजांचे नुकसान झाले होते. तर माण तालुक्यात १९ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि ११ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला. माण तालुक्यात एकूण अवकाळी बाधित क्षेत्र हे ३० हेक्टर, तर ६० शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले हाेते. यामधून शेतकरी सावरत असतानाच आठ दिवसांपासून वळवाचा तडाखा जिल्ह्यात बसत आहे. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे पुन्हा मोडले आहे.

जिल्ह्यात ७ एप्रिलला जोरदार वारे आणि वळवाचा पाऊस व गारपीट झाली होती. तर मागील चार दिवसांतही जिल्ह्यात पाऊस झाला आहे. यामध्ये गारपीटच अधिक होती. याचा फटका शेती पिकाला कमी बसलेला आहे. मात्र, फळबागांचे नुकसान अधिक झालेले आहे. जिल्ह्यातील शेती क्षेत्राची नजरअंदाजे नुकसानीची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आठवडाभरातील वळीव पाऊस आणि गारपिटीचा ३४६ हेक्टरला फटका बसलेला आहे. तर बाधित गावांची संख्या ५१ दिसून आलेली आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू असल्याने नुकसानीचा खरा आकडा लवकरच समोर येणार आहे. तरीही शेतकऱ्यांच्या माहितीनुसार अंदाजे ७ कोटींहून अधिक नुकसान झालेले आहे.

वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये अधिक करुन द्राक्षबागांचेच नुकसान आहे. कोरेगाव तालुक्यातही गारपीट होऊन १८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातीलही ६ गावांना दणका बसला आहे. माण तालुक्यातील ४ गावांत गारपिट झाली. यामध्ये ४३ हेक्टरवरील बागा आणि पिकांना फटका बसलाय. महाबळेश्वर तालुक्यात ४८ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. १७ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तर खंडाळा तालुक्यात ६ गावे बाधित असून १० हेक्टरवरील पिके आणि बागांचे नुकसान झाले आहे. जावळीत ५ गावांतील ३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आता झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे पिके आणि फळबागांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवत आहोत. तर पंचनामे सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. - भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अवकाळीत ८६ लाख रुपयांचे नुकसान...

अवकाळी पावसाचा तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला होता. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झाले होते. वाई तालुक्यात सर्वाधिक ५९ लाख ३२ हजारांचे नुकसान झालेले. यानंतर महाबळेश्वर तालुक्यात १७ लाख २८ हजार, तर माणमध्ये ९ लाख १४ हजारांचे नुकसान झाले होते.

Web Title: Due to unseasonal rain in Satara, loss of farmers, 51 villages affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.