‘कास’च्या पाणीपातळीत झपाट्याने घट

By admin | Published: April 14, 2017 10:59 PM2017-04-14T22:59:30+5:302017-04-14T23:25:42+5:30

केवळ दहा फूट पाणीसाठा; गेल्यावर्षीच्या तुलनेत एक फुटाने कमीच; सातारकरांवर टांगती तलवार

Due to the water level of 'Kas' rapidly decreasing | ‘कास’च्या पाणीपातळीत झपाट्याने घट

‘कास’च्या पाणीपातळीत झपाट्याने घट

Next

पेट्री : साताऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अर्धा ते एक फुटाने कमी आहे. गतवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस तलावात साडेदहा फूट पाणीसाठा शिल्लक होता; परंतु यंदा एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात पाणीपातळी अवघ्या दहा फुटांवर आली आहे.
कास तलावाची खोली २५ फूट असून, सध्या पाणीपातळी दहा फुटांवर आली आहे. तलावातून शहराला होत असलेल्या पाणीपातळीमुळे दररोज दीड इंच पाणीपातळी खाली जात आहे. तसेच आतापर्यंत एक-दोन वेळा वळवाचा पाऊस पडणे आवश्यक होते. उन्हाची तीव्रता अधिकाधिक वाढत असून, अद्याप एकही वळवाचा पाऊस न
झाल्याने तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. यामुळे तलावातील बहुतांशी ठिकाणच्या पाण्याखालचा भूभाग उघडा पडू लागला आहे.
दुसराही व्हॉल्व्ह उघडा पडण्याच्या मार्गावर
साताऱ्याला तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातील एक व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा पडला असून, यापुढे दीड फुटाने पाणीपातळी खालावल्यानंतर लवकरच दुसरा व्हॉल्व्हही उघडा पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर शेवटच्या तिसऱ्या व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

तलावात शिल्लक पाणीसाठा दहा फुटांवर आला असून, तलावातील मुरून वाया जाणारे पाणी दिवस-रात्र दोन इंजिनच्या साह्याने उपसा करून पाटात सोडले जात आहे.
- जयराम कीर्दत, पाटकरी, कास तलाव
यावर्षी उन्हाळा कडक भासत असून, तलावातील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. यामुळे एअर हॉल्व्ह तसेच जलवाहिनीला लागलेली गळती तत्काळ काढावी. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण होणार नाही.
- यशराज पवार, पर्यटक, सातारा


जलवाहिनीला चार ठिकाणी गळती
तलावातील पाणीपातळी खालावत असतानाच आटाळी व कासाणी हद्दीत चार ठिकाणी जलवाहिनीला गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. काही ठिकाणी एअर व्हॉल्व्हमधून कित्येक लिटर पाणी वाया जात आहे. पालिका कर्मचारी गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर करीत असून, आतापर्यंत दोन ठिकाणची गळती काढण्यात आली आहे. उर्वरित दोन ठिकाणचे काम येत्या तीन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे पाटकरी यांनी सांगितले.

Web Title: Due to the water level of 'Kas' rapidly decreasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.