निमसोड ग्रामस्थांचे पाणीटंचाईमुळे हाल

By admin | Published: April 10, 2017 09:45 PM2017-04-10T21:45:57+5:302017-04-10T21:45:57+5:30

विहिरींची पातळी घटली : गाळ मिश्रित पाणी पिण्याची ग्रामस्थांवर वेळ

Due to the water scarcity of Nimsod villagers | निमसोड ग्रामस्थांचे पाणीटंचाईमुळे हाल

निमसोड ग्रामस्थांचे पाणीटंचाईमुळे हाल

Next

वडूज : निमसोड, ता. खटाव येथे गत तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून, ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठीचा एकमेव आधार असलेल्या विहिरींमध्ये अत्यंत दूषित पाणी असून, त्याच पाण्यावर अनेकांना आपली तहान भागवण्यासाठी धडपडावे लागते. पाण्याविना सुरू असलेली ससेहोलपट थांबत नसल्याने ग्रामस्थांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने टँकरचा प्रस्ताव देऊनही प्रशासन मात्र सुस्तच आहे.
खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून निमसोडची जिल्ह्यात ओळख आहे. मातब्बर नेते येथे आहेत. गावची लोकसंख्या साडेदहा हजारांपर्यंत आहे. गावासाठी आजवर जलस्वराज्य योजना, प्रादेशिक योजना तसेच स्थानिक पाणी योजनेचा नळपाणी पुरवठ्याचा प्रयत्न झाला. मात्र, कोणतीच योजना ग्रामस्थांची तहान भागवू शकली नाही. डिसेंबरनंतर पाणीटंचाई सततच जाणवते.
यावर्षी प्रचंड उन्हाळ्यामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. विहिरींनी तळ गाठलाय, विंधन विहिरी ओस पडल्यात. तर ओढे, नाले, तलाव भेघाळलेत, त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिकच जाणवू लागलीय. निमसोडमध्ये मराठी शाळा, मठ व विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या बोअरचा ग्रामस्थांना आधार असतो. विठ्ठल मंदिराजवळची बोअर नादुरुस्त आहे. तर शाळा व मठाजवळील बोअरचे पाणी कमी झाले आहे. गावातील बहुतांश लोकांना गावच्या दक्षिण-पश्चिमेस असलेल्या बारवचा आधार असतो. मात्र, सध्या या बारवात डबक्याएवढेच पाणी आहे. तेच पाणी मिळविण्यासाठी रात्री एक वाजेपर्यंत बारवावर गर्दी असते. ४० ते ५० फूट खोलीवरून हे पाणी उपसावे लागते. निवडणुकीत पाणी देण्याच्या वल्गना सर्वच नेत्यांनी केल्या. मात्र, त्या वल्गना हवेतच विरल्या.
हिंगणगाव योजना गतिमान करण्याचा ग्रामपंचायतीने प्रयत्न केला खरा परंतु या उन्हाळ्यापर्यंत ही योजना पूर्णत्वास जाणे अशक्य असल्याने निमसोडकरांची पाण्यासाठीची होरपळ यावर्षी कायम राहणार, हे निश्चित. मागणी केल्याप्रमाणे निमसोडसाठी टँकर सुरू करावेत, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)



मे महिन्यात तहान भागणार
गत पंचवीस वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी निमसोडकरांना भटकंती करावी लागत होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हिंगणगाव (ता. कडेगाव, जि. सांगली) या तलावाच्या परिसरात विहीर खोदून कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्यात यश मिळाले आहे. १ कोटी ९९ लाख रुपये या योजनेला मंजूर झाले असून, ५५ लाखांचा पहिला हप्ता ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा आहे. या योजनेचे पाणी मे महिनाअखेर निमसोड गावाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच निमसोडकरांची तहान भागणार आहे.


निमसोड, ता. खटाव येथील विहिरींची पाणीपातळी घटली आहे.

Web Title: Due to the water scarcity of Nimsod villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.