बिबट्यासाठी उघडले किल्ल्याचे दक्षिणद्वार!

By admin | Published: February 18, 2016 11:09 PM2016-02-18T23:09:12+5:302016-02-19T00:19:10+5:30

अजिंक्यतारा : प्राण्यांना ये-जा करण्यासाठी केली गेली होती मागणी '

Dugar opened for leopard! | बिबट्यासाठी उघडले किल्ल्याचे दक्षिणद्वार!

बिबट्यासाठी उघडले किल्ल्याचे दक्षिणद्वार!

Next

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याला दक्षिण बाजूकडे नव्याने बसविण्यात आलेल्या दरवाजामुळे वन्यप्राण्यांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला असल्याची चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरात सुरू होती. याची दखल घेऊन बुधवारी काही प्राणिमित्रांनी हा दरवाजा वन्यप्राण्यांसाठी उघडला.
ऐतिहासिक वारसा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याला काही दिवसांपूर्वी दक्षिण बाजूकडील दरवाजा नव्याने बसविण्यात आला. हा दरवाजा बंद असल्यामुळे वन्यप्राण्यांचा मार्ग खुंटत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. दरवाजा बंद अवस्थेत असल्यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीत घुसत असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती.
वन्यप्राण्यांचा मार्ग बंद झाल्याने प्राणी अडकून राहतात. यासाठी हा दरवाजा सतत उघडा असणे गरजेचे आहे, अशी मागणी होत होती. त्यामुळे बुधवारी प्रशांत बोबडे, सचिन कल्याणी, दिग्विजय तोडकर या काही प्राणिमित्रांनी दुपारी हा दरवाजा संपूर्ण उघडला.
दरम्यान, दरवाजा बंद असला तरी प्राणी केवळ याच दरवाजातून ये-जा करतील असे नाही. किल्ल्यावर इतर मार्ग असल्याचे त्यांनी दाखवून दिले. शाहूनगरच्या बाजूने तटावर येणास जागा आहे. बिबट्या या बाजूने पाणी पिण्यासाठी किल्ल्यावरील बावडीशेजारील तळ्यावर जाताना लोकांनी पाहिले आहे. एक मार्ग बंद झाला तरी प्राणी दुसरा मार्ग शोधतात. दक्षिण दरवाजा प्राण्यांसाठी अपायकारक नाही आणि उपकारकही नाही, असेही प्राणिमित्रांनी सांगितले.


हा नवीन दरवाजा प्रशासनाने बंद केला नव्हता. कुणीतरी अज्ञाताने हे दार बंद केले असले तरी वन्यप्राण्यांचा मार्ग खुंटत नव्हता. प्राण्यांना ये-जा करण्यासाठी किल्ल्यावर इतर मार्गही आहेतच. मात्र, सोशल मीडियावर चर्चा करण्यात जेवढा वेळ घालविला गेला, तेवढ्या वेळात किल्ल्यावर जाऊन दरवाजा उघडता आला असता.
- अभिजित बापट,
मुख्याधिकारी, नगरपालिका

किल्ल्यावर पाणीसाठ्याची गरज
उन्हाळ्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्यावर असलेले पाणीसाठे आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत आहे. तसेच वणव्यामुळे झाडेझुडपे जळाली असून प्राण्यांना निवाराही राहिला नाही. दगडाच्या कपारी उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी वन्यप्राणी आसरा घेत नाहीत. वन्यजीवांसाठी किल्ल्यावर पाणीसाठ्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Dugar opened for leopard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.