अंधांसाठी डोळस काम !
By admin | Published: July 6, 2014 11:09 PM2014-07-06T23:09:42+5:302014-07-06T23:15:15+5:30
पन्नास हजारांचा निधी : कऱ्हाडचे विठामाता विद्यालय १४ वर्षे अव्वल
कऱ्हाड : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या सातारा शाखेच्या वतीने प्रत्येक वर्षी अंधनिधी संकलन केले जात. त्यामध्ये कऱ्हाडचे विठामाता विद्यालय यंदाही अव्वल स्थानी आहे. गत १४ वर्षे निधी संकलनात प्रथम क्रमांकावर राहण्याचे काम या विद्यालयाने केले आहे.
येथील शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे विठामाता विद्यालय नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमात अग्रभागी असते. त्याच एक भाग म्हणजे अंधांसाठी निधी संकलन! गत १४ वर्षे हे विद्यालय जिल्ह्यात सर्वाधिक निधी संकलन करण्यात यशस्वी झाले आहे.
अंध लोकांचे दु:ख काय असते, हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण या दु:खाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचे काम येथील शिक्षक करतात. त्यामध्ये शिक्षिका वैशाली जाधव यांचा मोलाचा वाटा असतो. त्याचा परिणाम म्हणून येथील विद्यार्थिनी जोमाने निधी संकलनात सहभागी होतात. अंधांप्रती त्यांच्या मनात असणारी सहानुभूती खरच कौतुकास्पद आहे. विठामाता विद्यालयाच्या या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी आर. एन. चव्हाण, गोपी मयूर, प्रकाश पाटील, उषा शानभाग यांनी कौतुक करुन आदर्श घेण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)