दारोदारी कचरा गाडी; तरीही अस्वच्छता
By admin | Published: February 20, 2015 09:53 PM2015-02-20T21:53:50+5:302015-02-20T23:14:21+5:30
मलकापुरात साचले कचऱ्याचे ढीग : नागरिकांच्या आडमुठेपणापुढे नगरपंचायत हतबल, जागृतीसाठी आधी दंड आता होणार गांधीगिरी
मलकापूर : शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नगरपंचायतीकडून दारोदारी घंटागाडी व दोन ट्रॅक्टर फिरवले जातात. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी २४ कचराकुंड्याही ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही काही नागरिक रस्त्याकडेलाच कचऱ्याचे ढीग लावतात. त्यामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे.रस्त्याकडेला कचरा टाकू नये, म्हणून दररोज घंटागाडीवर ध्वनियंत्रणा बसवून आवाहन करण्यात येते. काहीना नोटिसाही धाडल्या आहेत. मात्र आजही अनेक नागरिक जाता-जाता कचरा रस्त्याकडेला फेकतातच. यावर उपाययोजना करण्यात स्थानिक प्रशासनाने हात टेकले. शेवटचा उपाय म्हणून दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फूल देऊन रस्त्याकडेला कचरा न टाकण्याची विनंती करायचा निर्णय नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईला न जुमानणारे नागरिक या गांधीगिरीच्या उपायाला किती प्रतिसाद देणार, हा संशोधनाचा विषय आहे. स्वच्छ व निर्मल मलकापूरसाठी नागरिकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. यासाठी शाळांपासून सुरुवात करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
घंटागाडी जाताच कचरा रस्त्यावर
शाळेतील म्हणीप्रमाणे घंटागाडी दारात आल्यानंतर कचरा टाकण्याऐवजी गाडी पुढे गेली की कचरा बाहेर येतो. तो कचरा काही अंतरावर ठेवलेल्या कचराकुंडीत टाकण्याऐवजी आळस करून रस्त्याकडेलाच टाकला जातो. त्याच पद्धतीने अनेक हॉटेल व्यावसायिक ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकण्याऐवजी रात्रीच्या वेळी रस्त्याकडेलाच नाल्यात कचऱ्याचे डबे रिकामे करतात.
नगरपंचायतीच्या सुविधा
नगरपंचायतीच्या वतीने २४ कंटेनर महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. सहा घंटागाड्या गल्लोगल्ली कचरा गोळा करतात. दोन ट्रॅक्टर व एक कंटेनरद्वारे हॉटेल व्यावसायिकांचा कचरा गोळा केला जातो.
हक्क ‘बांधकाम’चा; काम नगरपंचायतीकडे
मलकापूर शहरातून ‘एमएसआरडीसी’ चा राष्ट्रीय महामार्ग व बांधकाम विभागाचे तीन रस्ते मार्गस्थ झालेले आहेत. हे सर्व रस्ते त्या-त्या विभागाच्या अखत्यारित आहेत. रस्त्याकडेच्या जागेवर ते स्वत:चे हक्कही सांगतात. मात्र, या रस्त्याकडेची देखभाल दुरुस्ती मात्र नाईलाजाने नगरपंचायत प्रशासनाला करावी लागत
आहे.
मलकापुरात गोळा होणारा कचरा विचारात घेता, तेवढ्या मोठ्या प्रमाणात नगरपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही. नागरिकांनी कचरा रस्त्याकडेला टाकू नये. त्याचबरोबर शहरातून बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाचे रस्ते जातात. त्या रस्त्याकडेची स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र फंड टाकावा लागतो. त्यासाठी अनेक अडचणी येतात. तरीही लवकरच घनकचरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी, मलकापूर
मलकापूर शहरात एेंंंशी टक्क्यांपेक्षा जास्त सुशिक्षित नागरिक वास्तव्य करतात. नगरपंचायतीने सोयी केल्या आहेत. तरीही काही नागरिक आडमुठे वागत असतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.
- मधुकर शेलार,
शिवसेना, माजी शहर प्रमुख
वैद्यकीय कचरा रस्त्याकडेला
शहरात वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी खासगी स्वतंत्र यंत्रणा फिरत आहे. याशिवाय कचऱ्यासाठी नगरपंचायतीने अनेक सुविधा केल्या आहेत. पन्नास फुटांवर कचराकुंडी असतानाही काही वैद्यकीय व्यावसायिक धोकादायक ठरणारा वैद्यकीय कचरा रस्त्याकडेलाच फेकतात.
दररोज पंधरा टन कचरा
मलकापूर शहरात प्रतिदिन सुमारे १५ टन कचरा गोळा होत आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपंचायतीकडे जागाच उपलब्ध नाही. सर्व कचरा हा जुन्या स्मशानभूमीच्या पाठीमागे गोळा केला जातो.
कचरा एकत्र असल्यामुळे जुन्या गावठाण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
कचरा एकत्र करण्यात आल्याने जुन्या गवाठाणात माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.