पुलाच्या भगदाडास डांबरी ठिगळ

By Admin | Published: March 10, 2017 10:52 PM2017-03-10T22:52:43+5:302017-03-10T22:52:43+5:30

पाचवडमध्ये डोळेझाक : भविष्यात ‘भुर्इंज’ घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता

Dump patch of bridges | पुलाच्या भगदाडास डांबरी ठिगळ

पुलाच्या भगदाडास डांबरी ठिगळ

googlenewsNext

पाचवड : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पाचवड, ता. वाई येथील उड्डाणपुलास गुरुवारी सिमेंटचा काही भाग तुटून भगदाड पडल्याची घटना घडली अन् पाचवडकरांच्या काळजाचा ठोका चुकल्यासारखे झाले. काही दिवसांपूर्वी भुर्इंज येथील उड्डाणपूल खचून कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता पाचवडच्या उड्डाणपुलाचीही रिलायन्स कंपनी व आयटीडीच्या ठेकदारांनी निकृष्ट काम करून पाडापाडीची मालिका सुरूच ठेवल्याने आपल्या दर्जाहीन कामाची जणू पोच पावतीच दिली असल्याची संतप्त भावना पाचवडकरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पडलेल्या भगदाडाचे कोणतेही निरीक्षण सक्षम अधिकाऱ्यांकडून न करता त्यावर तात्पुरते पॅचवर्क करून भगदाड झाकून टाकण्याचे काम ठेकेदारांनी केले असून, त्याठिकाणी भविष्यात मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम देशाच्या विकासाचे जरी असले तरी सुरुवातीपासूनच ते शेतकरी व नागरिकांच्या जणू जीवावर उठल्यासारखेच आहे. रिलायन्सच्या ठेकेदारांनी मनमानी कारभार करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सहापदरीकरणात केल्याने आजपर्यंत अनेकांना महामार्गावर आपले
प्राण सोडावे लागले आहेत. भुर्इंजचा उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी एका बाजूने सुरू केला असून, पाचवडचा उड्डाणपूलही लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात
येणार होता. मात्र, अचानक उड्डाणपुलास भगदाड पडल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्रभर पडलेल्या भगदाडाच्या खालील बाजूकडून वेल्डिंग व इतर काम केल्यानंतर शुक्रवारी उड्डाणपुलावर डांबर टाकून पॅच मारण्याचे काम रिलायन्सच्या ठेकदारांकडून सुरू होते. जिल्हा प्रशासकीय अधिकारी अथवा नॅशनल हायवे अ‍ॅथॉरटीचा सक्षम अधिकारी या उड्डाणपुलाकडे फिरकलाही नाही. (वार्ताहर)


सहापदरीकरणाचे काम ग्रामस्थांच्या मुळावर
महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम पाचवडकरांच्या जणू मुळावरच उठले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ओढ्यांचे प्रवाह सोडण्यापासून ते उड्डाणपुलास भगदाड पडण्यापर्यंत होत आलेले काम पाचवडकरांसाठी मोठी डोकेदुखीच ठरलेली आहे. येथील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनही वारंवार तोडून नागरिकांबरोबरच येथील ग्रामपंचायतीलाही आजपर्यंत अतोनात नुकसान सोसावे लागले आहे. आपल्या दैनंदिन कामासाठी उड्डाणपुलाखालून ये-जा करणारा येथील स्थानिक नागरिकभगदाड पडल्यापासून घाबरला असून, आपला जीव मुठीत घेऊनच या पुलाखालून तो जात आहे.


ठेकेदारांचा रात्रीस खेळ चाले
आजपर्यंत रात्रीचे काम करून बाजारपेठेतील पाचवडकरांची झोप उडवलेल्या महामार्गाच्या ठेकेदारांनी गुरुवारची रात्रही भगदाड मुजविण्यात घालविली. पडलेले भगदाड मुजवण्यासाठी रात्रीचा खेळ करून भगदाडास लिपण लावण्याचे काम या ठेकेदारांनी केले. मात्र, त्यांचा चाललेला रात्रीचा खेळ पाचवडकरांना भविष्यात किती किंमत मोजायला लावणार हे येणारा काळच सांगेल.

Web Title: Dump patch of bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.