हुंडा देणारही नाही अन् घेणारही नाही
By admin | Published: March 25, 2017 03:12 PM2017-03-25T15:12:22+5:302017-03-25T15:13:22+5:30
कामाठीपुऱ्यात महिलांसाठी कार्यशाळा : भटक्या विमुक्त समाजातील महिलांनी केला ठराव
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. २५ : समाजातील मुलीचा हुंडा घेणार नाही व हुंडा देणार नाही, त्याचबरोबर हुंडा या विषयावर काम करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा कामाठीपुरा येथे झालेल्या एका कार्यक्रमात भटक्या विमुक्त समाजातील महिलांनी केली. याबाबतचे दोन ठरावही मांडण्यात आले आणि त्याला एकमुखी मान्यताही देण्यात आली.
सर्वसमावेशक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने कामाठीपुरा येथे भटक्या विमुक्त महिलांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी हा ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पूजा कुडाळकर होत्या.
यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी आपले अनुभव मांडले. दरम्यान, छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी ह्यहुंडाह्ण या विषयावर पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी पूजा कुडाळकर आणि द्वारका पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी इस्लामपूर येथील प्रा. अर्जुन लाखे, प्रा. सतीश चौगुले, इकोनेट संस्थेच्या गौरी भोपटकर, उषा कुडाळकर, मीराताई कुडाळकर, कोयना जावळीकर, रजनी पवार, सर्वसमावेशक संस्थेच्या अध्यक्षा शैला यादव, नारायण जावलीकर यांची भाषणे झाली. रमेश जावळे यांनी आभार मानले. शैला यादव आणि गौरी सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अॅड. पवन जावळीकर, संदीप कुडाळकर, शंकर जावळे, अरुण जावळीकर, सज्जन कुडाळकर, कमल माळी आदी उपस्थित होते.
येथील कामाठीपुरा येथे झालेल्या भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या मेळाव्यात शैला यादव यांनी मार्गदर्शन केले. भटक्या विमुक्त महिला मेळाव्याचे संयोजन अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना, सार्थक महिला मंडळ, सातारा, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र आणि कामाठीपुरा येथील शिवाजी गणेश उत्सव मंडळाने केले. (प्रतिनिधी)