पठारावरील गवताची कुरणं बनतायत वणव्याचे भक्ष्य!
By admin | Published: January 17, 2016 11:18 PM2016-01-17T23:18:06+5:302016-01-18T00:41:51+5:30
विघ्नसंतुष्ट लावतायत आग : यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट; वनसंपदा धोक्यात
पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यावर येथील पशुधन पोसतं. एवढंच काय पण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागातील जनावरांचीही भूकही भागते. अशा या परिसराला आता मात्र विघ्नसंतुष्टांची नजर लागली असून वनवे लावून गवताच्या कुरणाची राख करण्यात ही मंडळी धन्यता मानताना दिसत आहे. विघ्नसंतोषी मंडळींच्या मतीचा कलंक झडला तरच पठारावर गवताचे कोंब फुटतील, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यवतेश्वर, कास, बामणोली या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच येथील संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने उदरनिर्वाहासाठी शेतकरी वर्ग गुरे सांभाळताना दिसतात. गुरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, सध्या या परिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील जनावरांनाही पोसणारा हा चारा नष्ट होत असल्यामुळे पठारावरील गावांतील जनावरांवरही अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. या प्रवृत्तींना वेळीच रोखले नाहीत तर भविष्यात कास पठारावरील जनावरे जगविण्यासाठी इतरांकडे चाऱ्यासाठी मदत मागण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, विविध प्रकारची वनसंपदा व प्राणीसंपदेने नटलेल्या या परिसरात वणवे लावल्यामुळे कित्येक वृक्ष बहरण्यापूर्वीच आगीत होरपळू लागले आहेत. पशुपक्ष्यांचे निवारे नष्ट होत आहेत. (वार्ताहर) कास पठारावर चरणाऱ्या जनावरांचे शेण, वन्यप्राण्यांची विष्ठा, मूत्र यापासून नैसिर्गिकरीत्या खताची निर्मिती होते. पठारावर वाढणाऱ्या वैविध्यपूर्ण वनस्पतींच्या वाढीसाठी हे खत पोषक ठरते. त्यामुळे परिसरात चरणाऱ्या जनावरांचा, तृणहारी वन्यप्राण्यांचा चारा वणव्यामुळे नष्ट होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान २०११-१२ या सालात पडलेल्या दुष्काळामुळे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून शेकडो टन ओला चारा या भागातून दुष्काळी भागात पाठविण्यात आला होता. यामुळे असंख्य गुरांना जीवनदान मिळाले होते. कास परिसराने केवळ फुलांचाच वारसा जपला नाही, तर या परिसरातील असंख्य गावांनी माणुसकीचाही वारसा जपल्याचं या निमित्तांनं अधोरेखित झालं आहे.