ढेबेवाडी खोऱ्यात बिबट्यांचा धुमाकूळ
By admin | Published: October 26, 2014 09:42 PM2014-10-26T21:42:51+5:302014-10-26T23:25:01+5:30
शेकडो जनावरांचा फडशा : शेतकऱ्यासमोरही होतो जनावरांवर हल्ला, ग्रामस्थांमध्ये घबराट
सणबूर : ढेबेवाडी विभागात बिबट्याची दहशत वाढली असून, चार महिन्यांत अनेक ठिकाणी पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. विभागातील अनेक ग्रामस्थांना वेळोवेळी बिबट्याचे दर्शनही झाले आहे़ बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांत सध्या घबराटीचे वातावरण असून, शेतीची कामे ठप्प झाली आहेत़ वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे़
ढेबेवाडी वन परिक्षेत्रात मोरणा विभागापासून ते दक्षिणेला शिराळा तालुक्याच्या हद्दीपर्यंत परिसर येतो़ पश्चिमेला काढणे येथून रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत ३० ते ४० किलोमीटरचा परिसर ढेबेवाडी वन परिक्षेत्रात समाविष्ट आहे.
हजारो एकर क्षेत्र घनदाट जंगलामध्ये असल्याने वन्य प्राण्यांचा येथे वावर वाढला आहे़ यामध्ये बिबट्याचे प्रमाण जास्त असल्याचे सध्या सुरू असलेल्या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यावरून दिसून येते़ अनुतेवाडी, कोळेकरवाडी, उंब्रजकरवाडी, घोटील, महिंद, काढणे, ढेबेवाडी या परिसरात वेळोवेळी बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले आहे़
विभागात बिबट्यांची संख्या मोठी आहे़ हे बिबटे भक्ष्याच्या शोधात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे टार्गेट करीत आहेत़ चार महिन्यांत विभागात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्यांवर बिबट्याचे हल्ले झाले आहेत़
दोन दिवसांपूर्वी अनुतेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना समोर आली आहे़ वन विभाग घटनास्थळी पंचनामे करत असले तरी हल्ला सत्र सुरूच आहे़ पिंजरा लावण्याचे धाडस वन विभागाला करता आलेले नाही़ एखादी घटना घडल्यावर वनविभागाचे अधिकारी पोहोचतात; मात्र घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत़ रात्रीच्या वेळी वाहनधारकांवर बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
विभागातील अनेक शेतकरी बाजारहाटासाठी ढेबेवाडीला जातात. त्यांना परत गावी येण्यास कधी-कधी उशीर होतो. त्यावेळी दाट झाडीतून मार्ग काढीतच त्यांना आपले घर गाठावे लागते. मात्र, बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही ग्रामस्थांना मुश्किल झाले आहे. काही शेतकरी उशीर झाल्यास ढेबेवाडीतच मुक्कामी राहत असून, सकाळ झाल्यानंतर ते आपल्या गावी परतात.
विभागातील गावांची ही परिस्थिती लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
...अन् जीवाला होता धोका
दोन दिवसांपूर्वी भरदुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अनुतेवाडी येथील शिवारात शेतकरी राजाराम दाजी खांडेकर यांच्या समोर बिबट्याने त्यांच्या शेळीवर हल्ला चढविला. राजाराम खांडेकर यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्यांच्याच जीवाला धोका निर्माण झाला होता. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे संपूर्ण विभागात भीतीचे वातावरण आहे़
शिकाऱ्यांचा वावर वाढला
वाल्मीक पठारावरील घनदाट जंगलात कऱ्हाड, पाटण, शिराळा तालुक्यांतील शिकाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे़ पर्यावरण सफर करण्याच्या नावाखाली येणाऱ्या अनेकांकडून या परिसरात रानडुक्कर, ससा, घोरपड, रानकोंबडी या वन्यप्राण्यांची शिकार स्वत:च्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी होत आहे़ अशा शिकाऱ्यांच्या मुसक्या अवळण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे़