‘जलयुक्त’च्या कामांचा जिल्ह्यात डंका
By Admin | Published: March 23, 2015 09:13 PM2015-03-23T21:13:26+5:302015-03-24T00:18:33+5:30
३५ कोटींची तरतूद : चांगला पाऊस झाल्यास ९५ टक्के टंचाईमुक्तीचा विश्वास
सातारा : जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवारच्या कामांचा धडाका सुरू आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजनमधून ३५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास पूर्ण झालेल्या कामांच्या आधारावर संपूर्ण जिल्हा ९५ टक्के टंचाईमुक्त होऊ शकतो, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. अभियान अधिक व्यापक व सक्रिय करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ३५ कोटी ८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील २१५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यातील ५५ कामे लोकसहभागातून सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांतच १९३ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या ५६ कामे प्रगतिपथावर आहेत. १८० पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ३७ पाझर तलावांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ६४ लाखांचा निधी लोकसहभागातून उपलब्ध झाला आहे. अनेक गावांतील लोक या अभियानासाठी काम करत आहेत. विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. याअंतर्गत १६ हजार विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या जून महिन्यापर्यंत १ हजार ५५ विहिरींच्या कामाचे उद्दिष्ट आहे.’
‘यावर्षी हाती घेतलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे चांगला पाऊस झाला तर जिल्हा ९५ टक्के टंचाईमुक्त होईल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. हिवरे, नलवडेवाडी तसेच जखिणवाडी या गावांनी जलसंधारणात क्रांती केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)