दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना महामोर्चानंतरच !
By admin | Published: September 30, 2016 01:17 AM2016-09-30T01:17:06+5:302016-09-30T01:27:01+5:30
पोवई नाक्यावर युद्धपातळीवर उभारणी : तरुणींसाठी शिवाजी सर्कलजवळ बारा बाय वीस फुटांचे व्यासपीठ
सातारा : साताऱ्यातील महामोर्चाला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने जय्यत तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी बॅनर, भगवे झेंडे लावले जात असतानाच पोवई नाक्यावर दोन भव्य मंडप उभारण्याचे काम गुरुवारी सुरू केले आहे. महामोर्चाचे नेतृत्त्व करणाऱ्या तरुणींसाठी आणि मोठ्या स्क्रीनसाठी स्वतंत्रपणे भव्य मंडप उभारले जात आहेत. दरम्यान, पोवई नाक्यावर महामोर्चा झाल्यानंतर ३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मराठा महामोर्चाचे नेतृत्त्व कोणतीही राजकीय व्यक्ती करणार नाही. या महामोर्चातील जमावासमोर निवेदनाचे वाचन तरुणीच करणार असून, त्यांच्या हस्तेच जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांना निवेदन दिले जाणार आहे.
पोलिस दलाने महामोर्चाचा मार्ग निश्चित केला असून हा मार्ग प्रत्येक आंदोलनकर्त्याला समजावा, यासाठी नकाशा तयार करून प्रसिद्ध केला आहे. प्रत्येक तालुक्यातून साताऱ्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांनी कोठे थांबायचे याचेही नियोजन करण्यात आले आहे.
पोवई नाक्यावरील शिवाजी महाराज पुतळा परिसर आंदोलनासाठी महत्त्वाचे ठिकाण असणार आहे. या ठिकाणी सात रस्ते मिळत असून, सर्व रस्ते फुलणार आहेत.
महामोर्चा पोवई नाक्यावर आल्यानंतर नेतृत्व करणाऱ्या तरुणी निवेदनाचे वाचन करणार आहेत. तसेच त्यांच्या भावना व्यक्त करणार आहेत. यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बारा बाय वीस फुटांचा मंडप उभारला जात आहे. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या स्क्रीनसाठी वीस बाय तीस फुटांचे भव्य व्यासपीठ उभारले जात आहे. (प्रतिनिधी)
शिवाजी सर्कल मंडळाचा निर्णय
सुवर्ण महोत्सवी शिवाजी सर्कल दुर्गोत्सव मंडळाने मराठा महामोर्चा डोळ्यासमोर ठेऊन मोठ्या मनाने वेगळा निर्णय घेतला आहे. एक आॅक्टोंबर रोजी रजताद्री नजीकच्या गणेश मंदिरात मंडळाची घटस्थापना केली जाईल. त्यानंतर मराठा महामोर्चा संपल्यानंतर ३ आॅक्टोंबर रोजी सायंकाळी नेहमीच्या ठिकाणी युध्दपातळीवर मंडप टाकला जाईल. त्यानंतर मंडळाच्या पारंपरिक जागेत दुर्गामाता मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत जागा बदलली जाणार नाही, असेही मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.
मावळ्यांची गाडी बंद पडली तर तातडीने ‘क्रेन’
खंबाटकी घाटात वाहतूक शाखा सज्ज : महामोर्चात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
महामार्गाचा एक रस्ता महामोर्चासाठी राखीव
पाठीवरील दप्तरासह सायकलवरही स्टिकर
शाळकरी मुलांमध्ये उत्सुकता : मराठा महामोर्चाची तयारी
आजीबार्इंच्या हाती महामोर्चाची सूत्रे !