निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना लॉटरी!

By admin | Published: January 11, 2017 11:38 PM2017-01-11T23:38:53+5:302017-01-11T23:38:53+5:30

जिल्हा बँक कर्मचारी भरती : ३७६ जणांना मिळणार रोजगाराची संधी ; २४६ लेखनिक, १३० शिपाई पदे

During the elections, lottery workers! | निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना लॉटरी!

निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना लॉटरी!

Next

सातारा : ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात जिल्हा बँक भरतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेत २४६ लेखनिक व १३० शिपाई अशा एकूण ३७६ कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली असून, या गोड बातमीमुळे अनेक वर्षे नेत्यांच्या पुढे-मागे करत फिरणाऱ्यांच्या आशेला उधाण आलेले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील निर्विवाद वर्चस्व ही राष्ट्रवादी पक्षाची जमेची बाजू आहे. जिल्ह्यातील परंपरागत घराण्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालकपद मिळवून आपले राजकीय अस्तित्व अबाधित ठेवलेले आहे. ‘सैन्य पोटावर चालते’ ही म्हण आहे, तीच राजकारणातही लागू पडते. साहजिकच निवडणुका लढविताना कार्यकर्त्यांची फौज महत्त्वाची; मात्र त्याच्या पोटाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारीही नेत्यांवर येऊन पडते. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे आपल्यासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांना अथवा त्यांच्या जवळच्या लोकांना रोजगाराची संधी देऊन कार्यकर्त्याला ‘बळ’ देण्यासाठी नेत्यांची नेहमीच धडपड असते.
मात्र, त्यासाठी अनेकदा काही कार्यकर्ते नाराज होतात, हे देखील खरे आहे.
ग्रामपंचायत, सेवा सोसायट्या, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा यांच्या निवडणुका एकमेकांत गुंतलेल्या असतात. साहजिकच या निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे मायक्रो प्लानिंग कायमच सुरू असते. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची आचारसंहिता लागून कुठल्याही वेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवरच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरतीला सहकार आयुक्तांची मंजुरी मिळालेली आहे. ही गोष्ट राष्ट्रवादीसाठी निश्चितच फायद्याची ठरू शकणारी आहे.
सहकार नियमांचे पालन करूनच ही भरती होणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, त्यावर पहिल्यापासून जसा राजकीय प्रभाव राहिला आहे, तोच या भरतीतही राहणार, हे अलिखित सत्य आहे. जिल्हा बँकेत २१ संचालक आहेत. प्रत्येक संचालकांना सरासरी १४ कर्मचाऱ्यांचा कोटा देणे शक्य असले तरी बँकेत ज्यांचा प्रभाव जास्त आहे, तीच मंडळी आपला अधिकार राखून ठेवून दबाव टाकू शकण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वाईकरांना मोठी संधी...
वाई विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मणराव पाटील, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे हे चार संचालक जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रतिनिधीत्व करत आहेत, त्यामुळे वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यांतील जिल्हा बँकेत नोकरी मिळण्याची संधी मोठी आहे.
उदयनराजे, जयकुमार यांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्हा बँकेतील संचालकाचे अधिकार मिळविण्यासाठी उदयनराजे भोसले व जयकुमार गोरे या दोघांनी आक्रमक पावले उचलली होती. आता या भरतीच्या निमित्तानेही हे दोन संचालक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Web Title: During the elections, lottery workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.