कऱ्हाडात दुर्गादेवी मूर्ती विसर्जन मिरवणुकीत मंडळांमध्ये धुमश्चक्री, तुफान दगडफेक; २५ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 01:25 PM2024-10-16T13:25:53+5:302024-10-16T13:26:31+5:30
कऱ्हाड (जि.सातारा) : दुर्गादेवी मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाइलवर व्हिडीओ केल्यावरून युवकांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी दांडक्याने मारहाण करण्यात ...
कऱ्हाड (जि.सातारा) : दुर्गादेवी मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाइलवर व्हिडीओ केल्यावरून युवकांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी दांडक्याने मारहाण करण्यात आली. जोरदार दगडफेक करण्यात आली. एका जीपचेही नुकसान केले. ही घटना कऱ्हाडातील नेहरू चौकात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यावरून २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. काही युवकांना अटकही केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडात सोमवारी रात्री काही मंडळांच्या दुर्गादेवी मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या होत्या. अशातच रात्री दहाच्या सुमारास नेहरू चौकामध्ये दोन नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक खटका उडाला. त्यातूनच जोरदार हाणामारी झाली.
युवकांनी एकमेकांना दांडके, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एकमेकांच्या दिशेने दगड भिरकावले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांना पाहिल्यानंतर जमाव तेथून निघून गेला.
दरम्यान, जमावाने एका जीपची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. दगडफेकीत काही युवक जखमीही झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.