सातारा मतदारसंघाचा तिढा सुटला, पण नाराजी नाट्य सुरूच; शिंदेंच्या हातात 'तुतारी'; पण जिल्हाध्यक्षांचीच 'नाराजी'

By प्रमोद सुकरे | Published: April 13, 2024 02:04 PM2024-04-13T14:04:57+5:302024-04-13T14:05:57+5:30

प्रमोद सुकरे कऱ्हाड : साताराचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वकीयांचाच विरोध लक्षात घेऊन निवडणुकीतून माघारीचा निर्णय घेतला. त्यामुळे ...

During the visit of Mahavikas Aghadi candidate Shashikant Shinde in Satara, there is talk of displeasure because the district president of the party was absent | सातारा मतदारसंघाचा तिढा सुटला, पण नाराजी नाट्य सुरूच; शिंदेंच्या हातात 'तुतारी'; पण जिल्हाध्यक्षांचीच 'नाराजी'

सातारा मतदारसंघाचा तिढा सुटला, पण नाराजी नाट्य सुरूच; शिंदेंच्या हातात 'तुतारी'; पण जिल्हाध्यक्षांचीच 'नाराजी'

प्रमोद सुकरे

कऱ्हाड : साताराचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वकीयांचाच विरोध लक्षात घेऊन निवडणुकीतून माघारीचा निर्णय घेतला. त्यामुळे नवा उमेदवार कोण? हे अनेक दिवस ठरत नव्हते. पण, आमदार शशिकांत शिंदे यांनी हातात ''तुतारी'' घेतल्याने महाविकास आघाडीच्या साताराच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. मात्र, शिंदेंच्या दौऱ्यात दस्तूरखुद्द पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्याच गैरहजेरीमुळे नाराजीनाट्य मात्र सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राष्ट्रवादीतून श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील या पिता- पुत्रांच्या नावाला होम पिचवर स्वकीयांकडूनच विरोध झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोध करणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याला यश काही आले नाही. मग पर्यायी नावे समोर आली. त्यात आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची नावे होती. यातील काहींनी निवडणूक लढविण्यास उत्सुकता दाखविली. काही अनुत्सुक राहिले, तर काहींनी शरद पवार म्हणतील तसं करू असे संकेत दिले. मात्र भविष्याचा वेध घेत माजी मंत्री, माथाडी नेते, आमदार शशिकांत शिंदे यांच्या हातात शरद पवार यांनी ''तुतारी'' दिली.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी शशिकांत शिंदे प्रथमच सातारा जिल्ह्यात आले. त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले. पण, या सगळ्यात एक अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे द राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची.

आमदार बाळासाहेब पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास अनुत्सुकता दाखवल्याने ही संधी आपल्याला मिळू शकते असा कयास सुनील माने यांनी बांधला होता पण, प्रत्यक्षात मात्र ''तुतारी'' दुसऱ्याच्या हातात गेल्याने ''माने या न माने'' पण रहिमतपूरचे सुनीलराव नाराज असल्याची चर्चा आहे. आता त्यांची नाराजी कशी दूर होणार ? हे पाहावे लागेल.

रहिमतपूर हे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचे शहर. सुनील माने यांनी येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. यापूर्वी एकदा विधान परिषद निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ती मिळाली नाही. त्यानंतर ते जिल्हा सहकारी बँक संचालक, उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पण, यंदा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीलाही ''कात्री'' लागली. आता लोकसभेची ''लॉटरी'' त्यांना लागेल अशी आशा होती. पण, तीही फोल ठरली. त्यामुळेच ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली हे मला माहीत आहे. पण, माझ्या घरातील काही अडचणीमुळे मी गुरुवारी शशिकांत शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये नव्हतो. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: During the visit of Mahavikas Aghadi candidate Shashikant Shinde in Satara, there is talk of displeasure because the district president of the party was absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.