दुर्गंधीचा दशकी काळ संपला..!

By admin | Published: October 19, 2015 09:37 PM2015-10-19T21:37:19+5:302015-10-19T23:42:02+5:30

पालिकेची स्वच्छता मोहीम : पन्नास कर्मचाऱ्यांचा सहभाग; पहिल्या दिवशी बोगदा परिसराची स्वच्छता

Dussehra period has ended! | दुर्गंधीचा दशकी काळ संपला..!

दुर्गंधीचा दशकी काळ संपला..!

Next

सातारा : नगरपालिकेने नव्याने घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी बोगदा परिसरात स्वच्छता करण्यात आल्याने गेल्या १५ वर्षांपासून दुर्गंधीच्या विळख्यात असणाऱ्या बोगदा परिसराने आज सुटकेचा श्वास सोडला, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली. तसेच पालिकेच्या या मोहिमेचे स्वागतही केले.
पालिकेने प्रत्येक प्रभागात ही मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे. या मोहिमेत एकूण ४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये प्रत्येकी दहा कर्मचाऱ्यांचा एक गट केला आहे. प्रत्येक गटाला चार मुकादम, चार भाग निरीक्षक अशी नेमणुका केल्या आहेत. दररोज एका गटाने एका प्रभागाची स्वच्छता करायची असून, सफाई कामगारांनी ही मोहीम रोजच्या कामाव्यतिरिक्त राबविली आहे. ही मोहीम सकाळी ७ ते ११ व दुपारी २ ते ५ या वेळेत राबविली जाणार आहे. सोमवारी पहिल्या दिवशी बोगदा ते शाहू चौक ते पोवई नाका या परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, सोमवारी येथील बोगदा मधील १५ वर्षांपासून गटारीचे अस्तित्व संपले होते. या बोगद्याचा नागरिक शौचालय म्हणून वापर करत होते. त्यामुळे या बोगद्यातून जाताना नाक मुठीत धरून जावे लागत होते. पालिकेने जेसीबी व ट्रॅक्टर, ट्रॉलीच्या साह्याने तुंबलेली, मुजलेली गटारे साफ केली. (प्रतिनिधी)


अशी होते सफाई...
या मोहिमेअंतर्गत सकाळी गवत काढणे, गटारी स्वच्छ करणे, मातीचे ढिगारे काढणे ही कामे होतात. तर दुपारच्या वेळी रस्ता झाडून काढून रस्त्यावर औषधफवारणी केली जाणार आहे.

शहरातल्या अस्वच्छतेबाबत होणाऱ्या टीका थांबविण्यासाठी सातारा नगरपालिकेने विशेष मोहीम आखली आहे. पालिकेत नव्याने भरती करण्यात आलेले ४५ स्वच्छता कर्मचारी व इतर पाच कर्मचारी अशा पन्नास कर्मचाऱ्यांची टीम शहरातील प्रभागांमध्ये जाऊन स्वच्छता करणार आहे.
- विजय बडेकर, नगराध्यक्ष
बोगद्यातील गटारी मुजल्यामुळे येथे दुर्गंधी पसरली होती. सकाळी या परिसरातून फिरायला येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या दुर्गंधीविषयी तक्रारी होत्या. त्यामुळे या बोगद्याची स्वच्छता केल्याने नागरिकांच्यात समाधानाचे वातावरण आहे.
-अंजली माने, आरोग्य सभापती, नगरपालिका

Web Title: Dussehra period has ended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.