‘कृष्णा’च्या निवडणुकीत पहिल्याच दिवशी प्रचाराचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:05+5:302021-06-19T04:26:05+5:30

झेड्यांसह बॕनर लावलेल्या गाड्यांची मलकापूरात रॕली निवडणुकीतील विशिष्ट गाण्यांचा आवाज गल्लोगल्ली घुमला लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर ‘कृष्णा’च्या निवडणुकीत प्रचारासाठी ...

The dust of campaigning on the first day of 'Krishna' election | ‘कृष्णा’च्या निवडणुकीत पहिल्याच दिवशी प्रचाराचा धुरळा

‘कृष्णा’च्या निवडणुकीत पहिल्याच दिवशी प्रचाराचा धुरळा

Next

झेड्यांसह बॕनर लावलेल्या गाड्यांची मलकापूरात रॕली

निवडणुकीतील विशिष्ट गाण्यांचा आवाज गल्लोगल्ली घुमला

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर

‘कृष्णा’च्या निवडणुकीत प्रचारासाठी केवळ दहाच दिवसांचा कालावधी आहे. चिन्ह वाटपानंतर पहिल्याच दिवशी प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला. झेंड्यांसह बॅनर लावलेल्या गाड्यांची रॅली काढल्यामुळे मलकापूरसह परिसरात प्रचारासाठी तयार केलेल्या विशिष्ट गाण्यांचा आवाज मलकापुरातील मुख्य रस्त्यांसह आसपासच्या गावात घुमला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ही प्रचाराची नवी पद्धत अवलंबली जात आहे.

सहकार क्षेत्रात चुरशीची आणि महत्त्वाची निवडणूक म्हणून ओळख असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २९ जून रोजी मतदान आहे. कोरोना परिस्थितीमुळे लांबलेल्या या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सुरेश भोसले, तसेच दोन माजी अध्यक्ष अविनाश मोहिते आणि इंद्रजित मोहिते आमने-सामने आहेत. तिरंगी लढतीत होणाऱ्या निवडणुकीत या तिघांचे भवितव्य ठरणार आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील पाच तालुक्यांवर प्रभाव टाकणाऱ्या या कारखान्याचे ४७,१६० सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुरुवातीला भोसले कुटुंबीयांच्या सहकार पॅनलकडे झुकलेल्या या निवडणुकीत तुल्यबळ आव्हान निर्माण करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे कारभारी अविनाश मोहिते आणि इंद्रजित मोहिते यांच्या मनोमिलनासाठी कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नानंतरही शेवटी मनोमिलन झाले नाही. पर्यायाने ‘कृष्णे’ची ही निवडणूक मागच्यासारखीच तिरंगीच होणार हे अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले आहे.

निवडणूक रिंगणात २१ जागांसाठी प्रत्येक पॅनलचे २१ असे ६३ आणि ३ अपक्षांसह एकूण ६६ उमेदवार आपापले नशीब आजमावत आहेत. तत्पूर्वी, तिन्ही पॅनलच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळातही गावोगावी जाऊन सभासदांच्या गाठीभेटी घेत प्रचाराचा पहिला टप्पा पूर्णही केला आहे. आपापल्या कार्यकाळातील कारभाराचे विश्लेषण मांडत विरोधकांच्या कामकाजावर टोकाची टीका होताना दिसत आहे. त्यातच राज्यातील दिग्गज नेत्यांच्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी होत असलेल्या सततच्या बैठकांमुळे निवडणूक अधिक चुरशीची झालेली आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी चिन्हांचे वाटप केले. चिन्ह वाटपानंतर एकाच रात्रीत सहकार पॅनलच्या प्रचारयंत्रणेने चांगलीच गती घेतली आहे. मलकापूर शहरासह परिसरातील गावागावांत झेंड्यांसह बॅनर लावलेल्या गाड्यांची रॅली काढली, तर ध्वनिक्षेपकांद्वारे प्रचारासाठी तयार केलेल्या गाण्यांचा आवाज गल्लोगल्ली घुमवला. शहरातून एकाचवेळी गाण्याच्या तालावर प्रचाराची रणधुमाळी करत गाड्याची रॅली फिरत असताना कारखान्याच्या निवडणुकीचा माहोल तयार झाला होता.

चौकट

संस्थापकांचेही गावोगावी बॅनर

माजी सहकार मंत्री दिवंगत विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पश्चात होणाऱ्या या कृष्णेच्या निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्या मदतीला काँग्रेसचे युवक नेते ॲड. उदयसिंह पाटील ठाम उभे राहिल्याने निवडणुकीत संस्थापक पॅनलची ताकद वाढणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. संस्थापक पॅनलचे बॅनर गावोगावी मुख्य चौकात झळकू लागले आहेत.

चौकट

गावागावांतील मुख्य चौकात ‘रयत’ची प्रश्नावली

या निवडणुकीत मंत्री विश्वजित कदम यांच्यासह त्यांची प्रचारयंत्रणा रयत पॅनलच्या प्रचारात सक्रिय झाली आहे, तसेच स्वतः डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सभासदांसह विरोधकांसाठी एक प्रश्नावली तयार केली आहे. त्या प्रश्नावलीचे बॅनर कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी झळकू लागले आहेत.

फोटो

मलकापूर शहरातून एकाचवेळी गाण्याच्या तालावर प्रचाराची रणधुमाळी करत गाड्यांची रॅली फिरत असताना शुक्रवारी कारखान्याच्या निवडणुकीचा माहोल तयार झाला होता. (छाया- माणिक डोंगरे)

Web Title: The dust of campaigning on the first day of 'Krishna' election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.