केबलच्या खुदाईने उपमार्गावर धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:42 AM2021-03-09T04:42:49+5:302021-03-09T04:42:49+5:30
काही दिवसांपासून विविध कंपनींच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. पूर्वेकडील उपमार्गालगत चर काढून केबल टाकण्याचे काम ...
काही दिवसांपासून विविध कंपनींच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. पूर्वेकडील उपमार्गालगत चर काढून केबल टाकण्याचे काम केले जात आहे. मात्र, संबंधित कंपनीने हे काम करत असताना काही ठिकाणी रस्त्याकडेला साधारण शंभर मीटर अंतरात खड्डे खणले आहेत. काम झाल्यानंतर हे खड्डे केवळ माती व दगडाच्या साहाय्याने बुजवले. तर काही ठिकाणी खड्डे उकरलेली माती रस्त्यातच टाकली आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने चर काढतात. केबल टाकून झाल्यावर जेसीबीनेच ती बुजवतात. त्यामुळे अनेक ठिकाणी दगड व मातीचे ढीग तसेच पडलेले आहेत. तर केबलचा जोड असतो त्याठिकाणी मोठा खड्डा तयार केला आहे. त्याला सुरक्षिततेसाठी केवळ कापडी पट्ट्या बांधल्या आहेत. असे खड्डे रात्रीच्या वेळी धोकादायक ठरत आहेत.
अनेक ठिकाणी हे खोदकाम केलेली चर बुजवण्यासाठी लावलेल्या ढिगातील खडीमिश्रित माती उपमार्गावर पसरल्याने व वाहनाच्या वर्दळीने उपमार्गालगतच्या व्यावसायिकांसह प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. बारीक खडी रस्त्यावर पसरल्यामुळे आपघात घडण्याची शक्यता आहे.
- चौकट
परवानगी कोण देते?
मलकापूर शहरामधील महामार्गासह दोन्हीही उपमार्ग रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित आहेत. तर विविध कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामाला संबंधित शासकीय विभाग की पालिका यापैकी नेमके कोण परवानगी देते? या कामात झालेल्या रस्त्याच्या नुकसान भरपाईची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.
- चौकट (फोटो : ०८केआरडी०८)
जोडणीसाठी जागोजागी खड्डे
चर काढत केबल टाकली आहे. मात्र, साधारणपणे प्रत्येक शंभर मीटर अंतरात केबल जोडणीसाठी खोल खड्डे खणण्यात आले आहेत. हेच खड्डे धोकादायक बनले आहेत. अशा रस्त्यातच खणलेल्या खड्ड्यात वाहने अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
फोटो : ०८केआरडी०७
कॅप्शन : मलकापूर येथे उपमार्गावर खडीमिश्रित वाळू पसरल्यामुळे वाहनांच्या वर्दळीने मोठ्या प्रमाणावर धुरळा उडत आहे. (छाया : माणिक डोंगरे)
.....................................................................