उपसभापतिपद राजघराण्याकडेच
By admin | Published: March 15, 2017 10:54 PM2017-03-15T22:54:35+5:302017-03-15T22:54:35+5:30
फलटण पंचायत समिती : रेश्मा भोसले, शिवरुपराजे खर्डेकर यांना संधी देऊन साधला मेळ
नसीर शिकलगार ल्ल फलटण
फलटण पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाल्या असून, उपसभापतिपद राजघराण्याकडेच ठेवण्यात आले आहे.
फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे एकहाती वर्चस्व असून, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ७ पैकी ६ व पंचायत समितीच्या १४ पैकी १२ जागा रामराजेंच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकताना सलग सहाव्यांदा पंचायत समितीची सत्ता राखली आहे. सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेश्मा भोसले आणि उपसभापतिपदासाठी शिवरुपराजे खर्डेकर यांनी आपली नामनिर्देशन पत्र पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याकडे दाखल केले होते. निवडून आलेल्या सदस्यांपैकी अन्य कोणाही संबंधित पदासाठी अर्ज दाखल न केल्यामुळे पीठासन अधिकारी जाधव यांनी सभापतिपदासाठी रेश्मा भोसले आणि उपसभापतिपदासाठी शिवरुपराजे खर्डेकर यांच्या नाव घोषित केले.
फलटण पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी तीन महिला प्रमुख दावेदार होत्या. साखरवाडी पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या रेश्मा भोसले, हिंगणगाव गणातून निवडून आलेल्या प्रतिभा धुमाळ व तरडगाव गणातून निवडून आलेल्या विमल गायकवाड यांच्यात प्रामुख्याने चुरस होती. मात्र, सभापतिपदाचा निर्णय पूर्णपणे रामराजेंच्या हातात असल्याने ते कोणाची निवड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेवटच्या क्षणापर्यंत रामराजेंनी नाव गुलदस्त्यात ठेवले होते. या तिघींपैकी एकीची निवड रामराजे करतात की अन्य प्रवर्गातून निवडून आलेल्या महिलेची निवड करतात याचीही उत्सुकता ताणली गेली होती. विमल गायकवाड यांचे पती वसंतराव गायकवाड यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलेले असल्याने त्यांच्या पत्नी विमल गायकवाड यांचे नाव पडले होते. त्यामुळे रेश्मा भोसले व प्रतिभा धुमाळ यांच्यात चुरस होती.
हिंगणगाव गणाला बरेच दिवस सभापतिपदाची संधी न मिळाल्याने त्या भागाला न्याय देण्याची मागणीही होत होती. मात्र, रामराजेंनी सभापतिपदी रेश्मा भोसले यांना संधी दिली.
शिवरुपराजेंना अनुभवाचा फायदा
उपसभापतिपदासाठी रामराजेंचे पुतणे विश्वजितराजे नाईक-निंबाळकर व शिवरुपराजे खर्डेकर यांच्यात चुरस होती. दोघेही राजघराण्यातील आहेत. यावेळेस शिवरुपराजे वगळता सर्व सदस्य प्रथमच निवडून आले असल्याने मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी माणूस असावा, या हेतूने रामराजेंनी शिवरुपराजेंना उपसभापतिपदासाठी संधी दिली आहे. रामराजेंचा शब्द अंतिम असल्याने सभापती व उपसभापतिपदासाठी कोणीही नाराज झालेले नाही. राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी आहे. भविष्यात रामराजे या इच्छुकांना कशाप्रकारे पदे देतात, हे पाहण्यासारखे आहे.