ई-पास नावालाच; शहरात कुणीही यावे आणि टिकली लावून जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:39 AM2021-04-27T04:39:25+5:302021-04-27T04:39:25+5:30

सातारा: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आता जिल्ह्यात व जिल्हांतर्गत ई-पासची सक्ती केली आहे; मात्र अनेकांना हा ई-पास नेमका ...

E-pass name only; Anyone should come to the city and wear a tikli | ई-पास नावालाच; शहरात कुणीही यावे आणि टिकली लावून जावे

ई-पास नावालाच; शहरात कुणीही यावे आणि टिकली लावून जावे

Next

सातारा: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आता जिल्ह्यात व जिल्हांतर्गत ई-पासची सक्ती केली आहे; मात्र अनेकांना हा ई-पास नेमका कुठे मिळतोय, हेही माहिती नाही. अनेक जण बिनधास्तपणे इकडून तिकडे वावरत आहेत. काहीजण खोटी कारणे देत आहेत तर काही जणांची खरोखर कारणे समोर येत आहेत. प्रत्येकाला तोंड देताना पोलिसांचे नाकीनऊ होत आहे तसेच महामार्गावर मात्र कडेकोट तपासणी केली जात आहे.

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत. यातील पाच ठिकाणी ई-पासची तपासणी केली जात आहे. तर काही ठिकाणी मास्क आणि गाडीची कागदपत्रे तपासली जात आहेत. विशेषत: महामार्गावर काटेकोरपणे तपासणी केली जात आहे; मात्र अनेक जण लांबचा प्रवास करून आल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळत असल्याचे दिसून येत आहे.ई-पास नसला तरी नेमक्या कारणाची खात्री करून त्यांना सोडून दिले जाते. त्याचबरोबर शहरांमध्ये या उलट परिस्थिती पाहायला मिळते. अनेक जण सकाळी ११ नंतर काही कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. पोलिसांनी अडवले नंतर मित्राला बघायला चाललोय, आईचा रिपोर्ट आणायला चाललोय, मेडिकलमध्ये औषध आणायला निघालोय, अशी कारणे देत आहेत. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव त्यांना सोडून द्यावे लागत आहे; मात्र खरोखरच ज्यांना गरज आहे. त्यांच्यावरही या ई-पासमुळे अन्याय होताना दिसत आहे. काहींना अर्जंट पास मिळत नाही. त्यामुळे तत्काळ त्यांना जावे लागते. अशावेळी मग पोलिसांनी रस्त्यात अडवले तर खरे कारण सांगूनही त्यांना त्यांची सुटका होत नाही.अशावेळी मग पोलिसांना हॉस्पिटलचा फोन नंबर देऊन सुटका करावी लागत असल्याचे पाहायला मिळाले.

सातारा शहरात येण्यासाठी लिंबखिंड, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, मोळाचा ओढा ही ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणांवर पोलिसांकडून ई-पासची तपासणी होत आहे.

चौकट ः सारोळा येथे कडक अंमलबजावणी

सातारा जिल्ह्यात येण्यासाठी एकमेव मार्ग पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गावर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी सारोळा हे मुख्य ठिकाण आहे. याठिकाणी सातारा पोलिसांनी दोन तपासणी नाके उभारली आहेत. या दोन्ही नाक्यावर २३ पोलीस कर्मचारी असून ई-पासची कडक अंमलबजावणी केली जात आहे. काही वेळेला इमर्जन्सी रुग्ण असल्यामुळे त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना सोडावे लागत आहे; मात्र जसे पूर्वी जिल्ह्यात मुंबई पुण्यावरून लोक येत होते तसे आता ही संख्या रोडावली असल्याचे दिसून येत आहे.

चौकट: १३ नाके १३८ पोलीस

जिल्ह्यात ई-पासची तपासणी करण्यासाठी १३ नाके आणि १३८ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हे सर्व पोलीस कर्मचारी आलटून-पालटून ड्युटी बजावत आहेत. सकाळी सात ते अकरा या दरम्यान अनेक जण प्रवास करत आहेत; मात्र दुपारनंतर रस्त्यावर वर्दळ असल्याचे दिसून येत आहे. यावेळी उन्हातान्हात पोलीस उभे असतात तर काही पोलीस झाडाचा आसरा घेऊन आपली ड्युटी बजावत आहेत.

चौकट ग्रामस्थांना ई-पासचा फटका

लिंबखिंडनजीक पोलिसांनी तपासणी केंद्र उभे केले असून या ठिकाणी आजूबाजूचे ग्रामस्थही शेतीच्या कामासाठी नेहमी ये-जा करत आहेत अशावेळी या ग्रामस्थांनाही ई-पासचा फटका बसत आहे. त्यांच्याकडे शेतात जाण्यासाठी पास नसल्यामुळे त्यांनाही पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. मात्र शेतकरी असल्याचे समजल्यानंतर पोलीसही त्यांना कोणताही त्रास न देता सोडून देत आहेत.

चौकट: प्रशासनाने ई-पासची सुविधा केली असली तरी अनेक जणांना पास कोठे मिळतो हेही माहिती नाही. त्यामुळे अनेकजण बिनापास घराबाहेर पडत आहेत. अशावेळी पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला त्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: सातारा शहरांमध्ये ही परिस्थिती दिसून येत आहे. पोलिसांना लोकांशी प्रश्न करून पोलिसांच्या तोंडाला अक्षरशः फेस येत आहे.

चौकट ः कारणे ऐकून पोलीस अवाक्‌

अनेक जणांची कारणे ऐकून पोलीसही अवाक्‌ होत आहेत. काहीजण हॉस्पिटलमध्ये दिलेला मोकळा डबा आणण्यासाठी बाहेर निघालोय असे आचंबित करणारे उत्तर देत आहेत. तर काहीजण हॉस्पिटलमधून फोन आला होता. त्यांना औषध द्यायचे आहे अशी उत्तरे देत असल्याचे समोर येत आहे. ही उत्तरे ऐकून पोलिसांचेही डोके चक्रावून जात आहे. आता नेमके काय करावे असे पोलिसांनाही सुचत नाही; मात्र सहानुभूतीचा विचार करून पोलीस सरतेशेवटी अशा वाहनचालकांना सोडून देत आहेत. काहीजण उशिरा कामावर निघालेले असतात असे लोकही पोलिसांना आम्हाला सोडा अशी विनंती करताना दिसून आले.

फोटो आहे

Web Title: E-pass name only; Anyone should come to the city and wear a tikli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.