ई-पीक पाहणी नोंद: सातारा जिल्ह्यात केवळ १० टक्के शेतकऱ्यांचीच नोंदणी; मदत कशी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:15 PM2022-10-12T12:15:17+5:302022-10-12T12:15:42+5:30
खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंद ही १५ ऑक्टोबरपर्यंतच करावी लागणार
नितीन काळेल
सातारा : शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असते, तसेच शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवावा लागतो. याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत असली तरी आतापर्यंत १० टक्केच खातेदारांनी नोंद केली आहे. त्यामुळे नोंद न करणाऱ्यांना मदत कशी मिळणार, हा प्रश्न असून आता तीनच दिवस उरले आहेत.
ई-पीक पाहणी नोंदीसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. ॲपद्वारे पीक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होते. ही नोंदणी शेतकऱ्यांनी स्वत:हून करायची आहे. यावर्षी खरीप हंगामातील ई-पीक ॲपद्वारे पेरा नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत आहे. तरीही १० टक्क्यांपेक्षा कमीच खातेदारांनी नोंद केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ९० टक्के खातेदार अजूनही या नोंदणीच्या बाहेर आहेत. येत्या तीन दिवसांत किती खातेदार नोंदणी करणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यात १० लाखांवर खातेदार
जिल्ह्यात एकूण १० लाख १५ हजार ६४९ खातेदार आहेत. १० ऑक्टोबरपर्यंत यामधील ८६ हजार ३८१ खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे केली आहे. याचे क्षेत्र ९७ हजार ९६३ हेक्टर आहे.
ई-पीक पेरणी तुम्ही कशी नोंदवाल...
स्मार्ट मोबाइलद्वारे गुगल प्ले स्टोअरवरून ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावे. यावर मोबाइल क्रमांकाची नोंद करावी. सात-बारामधील नावाप्रमाणे अचूकपणे नोंदणी करावी.
थेट लाभाच्या योजनेसाठी आवश्यक...
ही नोंदणी थेट लाभाच्या योजनेसाठी आवश्यक आहे. अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यासह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंद करणे गरेजेचे आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत मुदत...
खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंद ही १५ ऑक्टोबरपर्यंतच करावी लागणार आहे. त्यानंतर याची नोंद होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंद न झाल्यास फायदा होणार आहे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या हातात आता तीनच दिवस राहिले आहेत.
तांत्रिक समस्या...
ई-पीक पाहणी नोंदणीसाठी मोबाइल कव्हरेज नाही. काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल नाही. यामुळे ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत.
सातारा तालुक्यात सर्वाधिक नोंद...
जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजारांवर खातेदारांनी ई-पीक ॲपद्वारे नोंदणी केली आहे. यामध्ये सातारा तालुक्याचा प्रथम क्रमांक आहे. या तालुक्यातील सर्वाधिक २० हजार ३४१ खातेदारांनी नोंद केली आहे. यानंतर पाटण तालुक्यात १६ हजार ५६० खातेदारांनी नोंद केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात फक्त ८९१
महाबळेश्वर तालुक्यात खातेदारांची संख्या २२ हजार ४३२ आहे, तर येथील फक्त ८९१ शेतकऱ्यांनीच ई-पीक नोंदणी केली आहे. महाबळेश्वर तालुका सर्वांत मागे आहे. यानंतर मागे राहण्यात माण आणि वाई तालुक्याचा क्रमांक लागतो.
खरीप हंगामातील ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदविण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत आहे. सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी करावी, तरच शेतकऱ्यांना नुकसान व इतरवेळी याचा फायदा होतो. - प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी, महसूल