प्रत्येक गावात शिवरायांंची मूर्ती उभारणार
By admin | Published: February 15, 2015 12:56 AM2015-02-15T00:56:34+5:302015-02-15T00:57:51+5:30
कऱ्हाडात हिंदू युवा मेळावा : हजारो तरुणांची उपस्थिती, तरुणींकडून दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक
कऱ्हाड : हिंदू एकता आंदोलनच्या वतीने येथील कृष्णामाई घाटावर आज (शनिवार) आयोजित करण्यात आलेल्या हिंदू युवा मेळाव्यास सायंकाळी उत्साहात प्रारंभ झाला. या मेळाव्यास हजारो तरुणांनी उपस्थिती लावली. भगवा झेंडा हाती घेऊन घाटावर उपस्थित झालेल्या तरुणांमुळे कृष्णा घाट भगवामय झाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात छत्रपतींची मूर्ती उभारण्याचे काम हिंदू एकता येथून पुढे करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
मेळाव्यास भाग्यनगर हैद्राबाद येथील आमदार व गोरक्षा दलाचे प्रमुख ठाकूर राजसिंग-राजाभैय्या हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार संजय पाटील, शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, हिंदू एकता आंदोलनाचे प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर व हिंंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे उपस्थित होते.
सुरुवातीस आमदार शंभूराज देसाई यांचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘कऱ्हाडमध्ये आयोजित या मेळाव्यामुळे युवकांमध्ये जिद्द व प्रेरणा निर्माण होणार आहे. या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी वाटचाल करावी. छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. ’
हिंदू एकताचे कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष भूषण जगताप म्हणाले, ‘१९६८ पासून हिंदू एकता सामाजिक काम करीत आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात छत्रपतींची मूर्ती उभारण्याचे काम हिंदू एकता येथून पुढे करणार आहे. युवकांनी त्याला पाठबळ द्यावे.’
दरम्यान, यावेळी दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये मुलींनीही सहभाग घेतला होता. कऱ्हाडातील पाच मुलींनी दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर केली. युवकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रात्यक्षिकांना दाद दिली. तसेच एका युवकाने कुऱ्हाडीच्या साहाय्याने डोक्यावर नारळ फोडून दाखविला. त्यालाही उपस्थितांनी दाद दिली. (प्रतिनिधी)