फलटण तालुक्यात सहा रुग्णवाहिकांमुळे लवकर उपचार : रामराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:07+5:302021-07-18T04:28:07+5:30
फलटण : ‘जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी ही मागणी अनेक वर्षांची होती. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३१ ...
फलटण : ‘जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी ही मागणी अनेक वर्षांची होती. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३१ रुग्णवाहिका ह्या चौदाव्या वित्त आयोगातून घेतल्या आहेत. त्यापैकी सहा रुग्णवाहिका फलटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार आहेत,’ असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा परिषदेने चौदाव्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या ३१ पैकी सहा रुग्णवाहिका फलटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदरील रुग्णवाहिकांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, ‘महानंद’चे उपाध्यक्ष डी. के. पवार, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, पंचायत समिती सभापती शिवरूपराजे खर्डेकर, उपसभापती रेखा खरात, जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, रेश्मा भोसले, विमल गायकवाड, संजय कापसे, डॉ विक्रांत पोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.