५५ हजार कुटुंबांना भूकंपग्रस्त दाखले

By admin | Published: December 25, 2015 10:04 PM2015-12-25T22:04:33+5:302015-12-26T00:10:18+5:30

शंभूराज देसाई : पाटणमधील २४ गावांतील रस्त्यांसाठी साडेआठ कोटी मंजूर

Earthquake proofs for 55 thousand families | ५५ हजार कुटुंबांना भूकंपग्रस्त दाखले

५५ हजार कुटुंबांना भूकंपग्रस्त दाखले

Next

कऱ्हाड : ‘पाटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भूकंपग्रस्तांच्या दाखल्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय अधिवेशनात घेतला आहे. या तालुक्यातील ५५ हजार कुटुंबीयांना भूकंपग्रस्त दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे पाटण तालुक्यातील विविध २४ रस्त्यांसाठी साडेआठ कोटी ३२ लाख रुपये अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहेत,’ अशी माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवदौलत बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पाटील उपस्थित होते. आमदार देसाई म्हणाले, ‘हिवाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण अशा चर्चा पार पडल्या. यामध्ये व्याघ्र प्रकल्पासारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडून पाच आमदारांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी राज्य सरकारने एक हजार कोटी दिल्यानंतर हे अभियान आमदारांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मतदारसंघात राबविण्यात यावे, अशी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय आमदारांकडून मागणी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
पश्चिममेकडील व्याघ्र प्रकल्पासह अन्य वनहद्दीतील गावांमध्ये वन्यप्राण्यांपासून शेती पिकांचे व फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.
याबाबत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली गेल्यानंतर ती शासनाकडूनही दिली जात होती. मात्र, यावेळेस नुकसान भरपाई दुप्पट रकमेने देण्याचा निर्णय राज्य सरकारने या अधिवेशनादरम्यान घेतला आहे.
राज्य सरकारचे काम उत्तमरितीने सुरू आहे. जे यापूर्वीच्या सरकारला जमले नाही, ते काम युती सरकारने करून दाखवले आहे. कोल्हापूरला टोलमुक्त केले आहे, तर पाटणला भूकंपग्रस्तांचे दाखले देण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केले असल्याची माहितीही आमदार शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Earthquake proofs for 55 thousand families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.