मातीचा कुकर-फिल्टर अन् आंब्याच्या शेवया !
By Admin | Published: February 26, 2015 09:35 PM2015-02-26T21:35:53+5:302015-02-27T00:20:30+5:30
मानिनी जत्रा : महिला बचत गटांच्या उत्पादनांना भरघोस प्रतिसाद; लाखो रुपयांची उलाढाल
सातारा : ‘महिलांनी स्वावलंबी व्हावे, बचत गटांच्या उत्पादनातून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी आयोजित येथील मानिनी जत्रेत महिला बचत गटाच्या उत्पदनांची लाखो रुपयांची विक्री चार दिवसांत झाली आहे. यावर्षी मातीचा कुकर, फिल्टर तसेच आंबा, पाईनापलच्या शेवया हे आकर्षण ठरले आहे. त्याला मागणीही चांगली असल्याचे दिसत आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या जत्रेत जळगाव, नाशिक, सांगली, कोल्हापूरचे बचत गटही सहभागी झाले आहेत. येथील जिल्हा परिषद मैदानावर सातारा जिल्हस्तरीय विक्री प्रदर्शनाचे (मानिनी जत्रा) आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २७ पर्यंत चालणार आहे. यावर्षी या जत्रेत १५० बचत गट सहभागी झाले आहेत. त्यामध्ये खाण्यापासून ते खरेदीपर्यंतच्या सर्व वस्तूंचा समावेश आहे. यावर्षी मातीपासून तयार केलेला कुकर, फिल्टर आकर्षण ठरले आहे. कोरेगाव येथील गटाने मातीपासून बनविलेल्या वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत. त्यामध्ये कुकर, फिल्टर, मनी बँक, भांडी, जग असे त्याचे प्रकार आहेत. मातीच्या कुकरमध्ये भाजी, भात चांगल्याप्रकारे शिजवता येतो. हा कुकर चूल, स्टोव्ह, गॅसवरही वापरता येतो. व्यवस्थित वापर झाल्यास मातीची भांडी तीन-चार वर्षे चांगली चालतात. त्याचबरोबर मिरज (सांगली) तालुक्यातील टाकळी येथील मनस्वी बचत गटाच्या आंबा, स्ट्रॉबेरी आणि पाईनापलच्या शेवयांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. या बचत गटाच्या उत्पादनांना पुण्यापर्यंत मागणी आहे.
पुसेगाव येथील सेवागिरी महिला स्वयंसहाय्यता गटाच्या मातीच्या वस्तूंनाही मागणी आहे. तीन-चार वर्षे ही भांडी चांगल्याप्रकारे वापरता येतात. साखरवाडी, ता. फलटण येथील दृष्टी महिला बचत गटाचे उन्हाळी प्रॉडक्ट आहे. यामधील पापडची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आतापर्यंतच्या चार दिवसांत या गटाच्या उत्पादनाची ऐंशी हजारांहून अधिक रुपयांची विक्री झाली आहे. ठोसेघर, सातारा येथील महाराष्ट्र सह्याद्री एकता महिला बचत गटाचा शतावरी कल्प व पावडर ही अनेक आजारांसाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. या गटाच्या शहनाज शेख म्हणाल्या, ‘शतावर पावडर लोहवर्धक, बुद्धिवर्धक, भूक आणि रोगप्रतिकारक आहे. त्यामुळे आमचे उत्पादन परदेशातही जात आहे.’
मानिनी जत्रेत अनेक गट सहभागी झाले आहेत. प्रत्येकाचे उत्पादन
वेगळे आहे. प्रत्येक गटांच्या उत्पादनांना पहिल्या दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळे आतापर्यंत लाखो रुपयांची विक्री य मानिनी जत्रेत झाली
आहे. (प्रतिनिधी)
यंदा ७० ऐवजी ८१ स्टॉल...
मानिनी जत्रेचे हे आठवे वर्ष आहे. यावर्षीच्या जत्रेत सत्तर स्टॉलचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, चांगला प्रतिसाद मिळाला आणि ८१ स्टॉल करावे लागले. या स्टॉलमध्ये सुमारे दीडशे महिला बचत गटांचे स्टॉल आहेत. एकाएका गटाची रोजची विक्री ही चाळीस ते पन्नास हजारांच्या घरात आहे. जत्रेने महिलांना एक आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचाच प्रयत्न केला आहे, असे दिसून येते.
साताऱ्यातील या मानिनी जत्रेचा आमच्या बचत गटाला खूप फायदा झाला आहे. गेल्यावर्षी संपूर्ण यात्रेत आमच्या बचत गटाची एक लाख तीस हजारांची विक्री झाली होती. यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा अधिक विक्री होईल, असा अंदाज आहे.
- सुरेखा राऊत, साखरवाडी
मानिनी जत्रेत राज्यभरातील बचत गट सहभागी झाले आहे. या जत्रेत नाशिक येथील एका बचट गटाचा चुलीवर तयार केला जाणारा मांडं हा खाद्यप्रकार पहावयास मिळाला. हा पदार्थ बनविण्याची कला पाहून नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.