अपक्षच खाणार भाव
By admin | Published: July 26, 2015 09:58 PM2015-07-26T21:58:11+5:302015-07-27T00:21:02+5:30
वाईत अटीतटीचा सामना : वालेघर, किरोडे, जोरे येथे प्रशासक येण्याची शक्यता
संजीव वरे- वाई -तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ४३ गावांतील ग्रामपंचायतींसाठी ४५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले असून, १३१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर तीन ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवाराने अर्ज भरला नाही. २५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. भविष्यात गावोगावी दोन तर काही ठिकाणी तीन गटांत निवडणुका होणार आहेत. दोन काँग्रेस आमने-सामने असताना अपक्ष कुणाची मते खाणार याला भलतेच महत्त्व आले आहे.गावची ग्रामपंचायत म्हणजे गावच्या विकासाचा केंद्रबिंदू. गावची एकी असली की लोकसहभागातून गावची विकासकामे, मोठमोठे प्रकल्प, शासनाच्या विविध योजना चांगल्या प्रकारे राबवून गावचा सर्वांगीण विकास व गावची शांतता टिकण्यासाठी निवडणुका बिनविरोध करणारी गावे सुरुर, सटालेवाडी, आनंदपूर, व्याहळी (पुनर्वसन) वयगाव, दह्याट, बेलमाची, खानापूर, शेलारवाडी, वेरुळी, कळंबे, बोरगाव, मालतपूर, पांढरेचीवाडी, नागेवाडी, रेनावळे, जांभळी, उळुंब, खावली, कोंढवली, अनपटवाडी, दरेवाडी, नांदगणे, दसवडी, बोरीव ही आहेत. तर बावधन, बोपेगाव, पसरणी, चिखली आणि अभेपुरी या गावांत अटीतटीच्या व रंगतदार लढती होणार आहेत. अनवडी, आसरे, भोगाव, चांदक, देगाव, धोम, एकसर, कडेगाव, खोलवडी, मोहडेकरवाडी, मुंगसेवाडी, निकमवाडी, पांडेवाडी, राऊतवाडी, वेलंग, विरमाडे, वासोळे, मुगाव, आकोशी, आसले, गुळुंब, गुंडेवाडी, लोहारे, मांढरदेव, मेणवली, परखंदी, शेंदूरजणे, शिरगाव, उडतारे, वरखडवाडी, वहागाव, वाशिवली, व्याजवाडी, गाढवेवाडी, धावडी परतवडी या गावांतील उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर वालेघर, किरोडे व जोर येथे प्रशासक येण्याची शक्यता आहे. अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून, यावेळी काँग्रेस व त्यांच्यातच खरी लढत आहे.
शिवसेना काही गावांत आपले प्रतिनिधी निवडून आणण्यात जोर लावते का? हेही आगामी काळात दिसून येईल. काही गावांत काँगे्रस, राष्ट्रवादीबरोबर तिसऱ्या अपक्षांच्याही लढती होऊन याचा फटका कोणाला बसतो? हेही निकालानंतर स्पष्ट होईल. आपले वरिष्ठ नेते एकमेकांत वेळप्रसंगी सलगी करताना मात्र गावोगावी एकमेकांची जिरवा जिरवीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगतदार ठरणार, हे मात्र निश्चित.
ग्रामपंचायत निवडणूक राजकारणाचे दुष्परिणाम
शेतातील कामे करण्यासाठी मशागती व वारंगुळे सोडून दिले जातात. त्यामुळे ज्यांच्याकडे बैल व अवजारे नसतात त्यांना खूप त्रास होतो.
सत्ताधारी गटाच्या ग्रामसभांना विरोधी ग्रामस्थ न आल्याने निर्णय तडीस जात नाहीत.
लोक सहभाग व लोक वर्गणी दोन गट झाल्याने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प योजना रखडतात.
एकमेकांवर कुरघोडी, उणीधुणी काढण्याने गावची विकासकामे होत नाहीत.
एक गाव एक गणपती, डॉल्बी बंद असे निर्णय व वेगवेगळ्या कमिट्या स्थापनेत अडसर येतो.
पावसापेक्षा प्रचाराचा जोर वाढला
तालुक्यात पावसाचा जोर कमी; पण प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. मधल्या काळात उघडीप दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. परंतु ऐनवेळी पुन्हा पावसाचे आगमन झाले आणि पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे पदयात्रा, बैठका, जेवणावळी, प्रचाराचा जोर मात्र वाटला आहे. अनेक गावांत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रमुख लढती आहेत. मात्र या पक्षातील बंडखोर व अपक्ष उमेदवार कोणाचे मतदान घेणार यावरही अनेक निकालांची गणिते फिरतील.